
परभणी तालुक्यातील मुरुंबा येथे एका पोल्ट्री फॉर्ममध्ये दोन दिवसात 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या गावातील कोंबड्यांच्या खरेदी-विक्रीला बंदी केली आहे.
परभणी तालुक्यातील मुरुंबा येथील विजयकुमार झाडे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये गुरुवारी 336, तर 8 जानेवारी रोजी 464 कोंबड्या अचानक मृत्यू झाला. 24 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांनी 34 दिवस वय असलेले हे 800 पक्षी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर येथून खरेदी केले होते.
या कोंबड्यांना लासोटा, मानमोडी, आयबीडी, मरेक्स या रोगाची लस देण्यात आली होती. कावेरी या जातीच्या या कोंबड्या अंदाजे 1.5 ते 2 किलो ग्रॅम वजनाच्या असून त्यांचे वय 3.5 महिने होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर परभणी येथील पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. मृत कोंबड्याचे नमुने पुणे येथील अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी याबाबत शुक्रवारी एक आदेश काढला आहे. कोंबड्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट नसल्याने अज्ञात रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता असल्याने मुरुंबा येथे तापसणीचे काम पूर्ण होईपर्यंत या गावातील कोंबड्यांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा प्रदर्शन याला बंदी करण्यात आली आहे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. मुरुंबा गाव शिवारातील 5 कि.मी. परिसरात हा आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच मुरुंबा हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.























































