
शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या व लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पाडणाऱया ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेकरिता अवघ्या 50 जणांच्या उपस्थितीत धार्मिक विधी व यात्रा पार पाडण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे.
यात्रेतील 68 लिंगतैलाभिषेक, अक्षता सोहळा, होम प्रदीपन सोहळा आदी सर्व धार्मिक विधी परंपरेप्रमाणे पार पाडण्यासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान, या धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी मंदिर परिसरात 144 कलम लागू करण्यात येणार असून, पासधारकांनाच प्रवेश देण्याचे नियोजनही महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या या महायात्रेला 900हून अधिक वर्षांची परंपरा आहे. ही महायात्रा या कोरोना सावटाखाली होत आहे. प्रशासनाने कोरोना नियम पाळून यात्रेतील धार्मिक विधी पार पाडण्याची परवानगी दिली असून, पालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहेत.
सोलापूर जिल्हा प्रशासनाने महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त तसेच आपत्ती व्यवस्थापन विभाग, आरोग्य विभागाचा अभिप्राय घेऊन हा अहवाल राज्य शासनाला सादर केला होता.
दरम्यान, शासनाने यात्रा भरविण्याबाबतचे अधिकार विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱयांना दिले. विभागीय आयुक्तांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली तयार करून यात्रा साजरी करण्याबाबत महापालिका आयुक्तांना निर्देश दिले. त्यानुसार पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी यात्रेतील धार्मिक विधी पार पाडण्यासाठी आदेश काढले आहेत.
या आदेशानुसार यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 12 जानेवारी रोजी तैलाभिषेक धार्मिक विधीच्या मिरवणुकीस परवानगी नाकारली आहे. सातही नंदीध्वज मंदिरात ठेवून विधी पार पाडावेत. प्रत्येक नंदीध्वजासोबत पाच व्यक्ती याप्रमाणे 35 भाविक व त्याच्यासमवेत 15 पुजारी व मानकरी अशा एकूण 50 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. देवस्थान समितीने दोन दिवस अगोदर भाविकांची यादी पोलीस विभागाला सादर करावी, असे आदेश आहेत. चार दिवस चालणाऱया या विधीसाठी 50 जणांना परवानगी देण्याबरोबरच पाचव्या दिवशी होणारा कप्पडकळी कार्यक्रम मिरवणुकीसही परवानगी नाकारली आहे.
होम मैदानावर स्टॉल्स उभारण्याला मनाई
विजापूर रोडवरील रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोरील जागेत यंदा जनावरांचा बाजार भरणार नाही व होम मैदानावर उभारण्यात येणारे विविध स्टॉल, करमणूक व मनोरंजनाच्या साधनांची दुकाने यंदा उभारण्यात येणार नाहीत. नंदीध्वजांची मिरवणूक निघणार नाही.
1930 रोजी चार हुतात्म्यांना फाशी दिल्यानंतर नंदीध्वज मिरवणुकीला बंदी घालण्यात आली होती. गेल्या 90 वर्षांतील ही दुसरी वेळ आहे, तर यंदाच्या वर्षी कोरोनामुळे नंदीध्वजाच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत.
योगदंड पूजनाने महायात्रेला प्रारंभ
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या महायात्रेला आजपासून धार्मिक विधीने प्रारंभ झाला. रविवारी परंपरेप्रमाणे शिवशंकर कहीकर हे हिरेहब्बू यांच्या वाडय़ातील योगदंड शुक्रवार पेठेतील कै. रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाडय़ात घेऊन आले. योगदंड घेऊन आल्यानंतर शेटे यांचे वारस ऍड. मिलिंद थोबडे व ऍड. रितेश थोबडे यांनी योगदंडाची विधिवत पूजा केली.
माजी उपमहापौर विजया थोबडे, सुचेता थोबडे व थोबडे कुटुंबीयांनी पंचारती ओवाळून योगदंडाचे दर्शन घेतले. याप्रसंगी मानकरी सागर हिरेहब्बू, सिद्धलिंग हिरेहब्बू, सुरेश हिरेहब्बू, आकाश हिरेहब्बू, विजयकुमार हिरेहब्बू, दीपक हिरेहब्बू व मानकरी उपस्थित होते. तत्पूर्वी महाशिवयोगी श्री सिद्धेश्वर व कुंभार कन्येच्या विवाह सोहळ्यातील धार्मिक विधीसाठी लागणाऱया मातीच्या 56 घागरी कुंभार समाजाकडून पहिल्या नंदी ध्वजाचे मानकरी हिरेहब्बू यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
तैलाभिषेक करण्यासाठी वाहनातून प्रवास
12 जानेवारी रोजी 68 लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी सातही नंदीध्वज व योगदंडधारकाला वाहनातून प्रवास करण्यासाठी प्रशासनाने एका पत्रकाद्वारे परवानगी दिली आहे. योगदंडधारक व सात ध्वजांच्या प्रत्येकी एका मानकऱयाकरिता सिद्धेश्वर देवस्थान मंदिर समितीने वाहनाची सोय करावयाची असून, या वाहनाला पोलीस विभागाकडून पास घेणे बंधनकारक करण्यात आल्याचे पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
घागरीच्या कार्यक्रमात हलगी वाजविल्याने जप्त
कुंभारकन्या परिवाराकडून 56 मातींच्या घागरी मानकऱयांना देण्याचा कार्यक्रम सकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी कुंभारवाडय़ासमोर या कार्यक्रमासाठी हलगी (वाद्य) वाजविणारे आले होते. हलगी वाजविताना वाद्य जप्त करण्यात आले. धार्मिक विधी करा; परंतु वाद्य वाजवित मिरवणूक काढू नका, अशी सक्त ताकीद त्यांना देण्यात आली.




























































