
पश्चिम बंगालमध्ये याच वर्षी 294 जागांसाठी विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. तत्पूर्वी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आमनेसामने आले आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडताना दिसतेय. मतदारांनी आपल्या पारड्यात मत टाकावे यासाठी दोन्ही पक्षा जोमाने कामाला लागली असून सभा, भेटीगाठी सुरू आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आयोजित एका सभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचा कचरा झाला आहे. ज्या दिवशी भाजपचा पराभव होईल, त्या दिवशी भाजपचे समर्थक देखील ट्रंप समर्थकांचा कित्ता गिरवतील असे विधान ममता बॅनर्जी यांनी केले आहे. ‘न्यूज 18 लोकमत’ने याबाबत वृत्त दिले आहे.
अमेरिकामध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रंप यांना जो बायडन यांच्याकडून पराभव सहन करावा लागला. तसेच जॉर्जियात 2 जागांसाठी झालेल्या निवडणुकीतही पराभव झाला. हा पराभव डोळ्यासमोर दिसू लागताच ट्रंप समर्थकांनी राडा घालण्यास सुरुवात केली. ट्रंप यांचे समर्थक थेट व्हाईट हाऊसमध्ये घुसले होते. यादरम्यान झालेल्या गोंधळात काही जणांना आपला जीवही गमवावा लागला होता. याचाच हवाला देत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली.
तपाससंस्थेची भिती दाखवून…
तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक जण तृणमूल सोडून भाजपचा हात हाती घेत आहेत. या पार्श्वभूमिवर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘तपाससंस्थांच्या भितीपोटी अनेक जण भाजपमध्ये जात आहेत. अनेकांनी पैसा कमावला. त्यांनी भिती दाखवून भाजप आपल्या झोळीत घेत आहे. भाजप कचरा पार्टी झाली असून दुसऱ्या पक्षातील बेकार लोकांना पक्षप्रवेश देत आहे.’ तसेच यावेळी बंगालमध्ये एनआरसी लागू करू देणार नाही, असा पुनरुच्चार देखील त्यांनी केला.
राजीनामा सत्र सुरुच
दरम्यान, तृणमूल काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरुच आहे. ममता सरकारमधील मंत्री शुभेंदू अधिकारी यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर गेल्याच आठवड्यात क्रीडा मंत्री लक्ष्मी रतन शुक्ला यांनी राजीनामा दिला. मंत्रीपदासह त्यांनी हावडा जिल्ह्याचे टीएमसी जिल्हाध्यक्षपदही सोडले.




























































