
महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या गटनेतेपदावरून नगरसेवकांच्या बैठकीत नाराजीनाटय़ रंगले. उपमहापौर आनंदा देवमाने यांनी अनुभवी नगरसेवकांवर जबाबदारी सोपविण्याची मागणी करीत पक्षश्रेष्ठींनी बंद लिफाफ्यातून दिलेल्या नावाला जोरदार विरोध केला. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण होते.
अखेर नवख्या नगरसेवकाला गटनेतेपद देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने उमहापौर देवमाने यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. आता पुढील आठवडय़ात होणाऱ्या महापौर, उपमहापौर निवडीत देवमाने भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत मिळत आहेत.
भाजपचे नगरसेवक युवराज बावडेकर यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिल्याने नव्या नेता निवडीसाठी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला आमदार गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, कोअर कमिटीचे सदस्य शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, मकरंद देशपांडे, सुरेश आवटी, महापौर गीता सुतार, उपमहापौर आनंदा देवमाने यांच्यासह पक्षाचे 43 नगरसेवक उपस्थित होते.
पक्षश्रेष्ठींकडून नाव आले आहे, असे सांगून मकरंद देशपांडे यांनी विषय थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावरही देवमाने भडकले. सर्व सदस्यांचे मत ऐकून निर्णय घ्या. तुम्ही वरून आणलेले नाव चालणार नाही. तुम्ही आणलेले नाव आम्ही स्वीकारणार नाही, असे म्हणताच बैठकीतील वातावरण तापले. अखेर देवमाने यांनी माझ्या मनाला पटेल तेच करणार, असे म्हणून बैठकीवर बहिष्कार टाकला. देवमाने यांच्या भूमिकेमुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात महापौरपदाची निवड होणार आहे. या निवडीवेळी देवमाने भाजपला धक्का देण्याची शक्यता आहे.
महापालिकेत भाजपचे काटय़ावरचे बहुमत आहे. त्यात उपमहापौर देवमाने यांनी वेगळी भूमिका घेतल्यास भाजपला धक्का बसू शकतो. देवमाने यांच्यासोबत चार ते पाच नगरसेवक असल्याचा दावा केला जात आहे. त्यात उपमहापौरांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याची तयारी चालविल्याचे समजते. त्यामुळे आगामी महापौर निवडीवेळी भाजपला सावध पावले टाकावी लागणार आहेत.
चंद्रकांत पाटील शब्द पाळत नाहीत
बैठकीत उपमहापौर देवमाने यांनी नवख्या नगरसेवकांवर गटनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यास विरोध केला. स्वाती शिंदे, भारती दिगडे, अनारकली कुरणे यांच्यासारख्या अनुभवी नगरसेवकाला गटनेता करा. महापालिकेचे कामकाज माहीत नाही, अशा सदस्याला गटनेता करून काय उपयोग, अडीच वर्षांत काय केले? पुढील निवडणुकीत जनतेसमोर जाण्यासाठी आपल्याकडे तोंड नाही.
भाजप प्रवेशावेळी चंद्रकांत पाटील यांनी मला व शिवाजी दुर्वे यांना शब्द दिला होता. दुर्वेचा तर चेंडू केला आहे. तुम्ही शब्द पाळू शकत नाही, असा आरोप देवमाने यांनी केला. यावर दोन्ही आमदारांसह कोअर कमिटीचे सदस्य आवाक झाले.


























































