
सांगली शहरानजीक कर्नाळ रस्त्यावर असणाऱया हॉटेल रणवीरमधील हाय प्रोफाईल वेश्याव्यवसायावर सांगली पोलिसांनी धडक कारवाई केली. यात आटपाडीच्या पोलीस निरीक्षकासह सहा संशयितांना अटक करण्यात आली, असून, दोन तरुणींची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
आटपाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण देवकर, हॉटेलमालक राघवेंद्र शेट्टी, रवींद्र शेट्टी, राजेश यादर, शिवाजी वाघले, सत्यजित पंडित अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सांगली शहरानजीक हॉटेल रणवीरमध्ये खुलेआम हाय प्रोफाईल वेश्याव्यवसाय चालत असल्याची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांकडे आल्याने अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने रात्री उशिरा या हॉटेलवर छापा टाकून वेश्याव्यवसाय उद्ध्वस्त केला. विशेष म्हणजे या छाप्यात आटपाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण देवकर यांच्यासह या हॉटेलमालक राघवेंद्र शेट्टी, रवींद्र शेट्टी, राजेश यादर, शिवाजी वाघले, सत्यजित पंडित यांना अटक करण्यात आली आहे. तर, दोन महिलांची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे.
अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक मायादेवी काळगावे यांनी फिर्याद दिली आहे. उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सोलापुरात लॉजवर छापा; चौघांना अटक
बसस्थानक परिसरातील विश्वमिलन लॉजवर छापा घालून वेश्याव्यवसाय चालविणाऱया चौघांना पोलिसांनी अटक केली असून, सहा महिलांची सुटका केली आहे. सूरज अवसेकर (रा. रंगभवन), राहुल सोनकांबळे (रा. मिलिंदनगर, बुधवार पेठ), मल्लिनाथ विभुते (रा. शिंगडगाव, ता. द. सो.), सोपान लांबतुरे (रा. थोबडेवस्ती, देगाव नाका) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बसस्थानक परिसरातील विश्वमिलन लॉजमध्ये अवैधरीत्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दुपारी अडीचच्या सुमारास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पोलीस पथकाने छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले. फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक बजरंग साळुंके तपास करीत आहेत.































































