
सीबीएसई बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱया दहावी, बारावी परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक बोर्डाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे. 4 मेपासून या परीक्षा सुरू होतील. दहावीची परीक्षा 7 जून तर बारावीची 11 जूनपर्यंत चालणार आहे.
बारावीची परीक्षा यंदा दोन सत्रांत घेण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षेचा कालावधी कमी झाला आहे. गेल्यावर्षी दोन्ही परीक्षा 45 दिवसांत पार पडल्या होत्या, पण यंदा परीक्षा 39 दिवसांत आटोपण्यात येणार आहेत. दहावीच्या एकूण 75 तर बारावीच्या 111 विषयांची परीक्षा पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाण्यास अडचणी येऊ नयेत यासाठी 3 महिने आधीच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असल्याचे सीबीएसई बोर्डाचे परीक्षा नियंत्रक डॉ. सन्यम भारद्वाज यांनी स्पष्ट केले. तसेच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनीदेखील ट्विटरवरून परीक्षेचे वेळापत्रक शेअर केले आहे.


























































