
मुंबईत कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून मार्च 2020 पासून सुरू असलेला लढा आता विजयी टप्प्यावर आला आहे. मुंबईत सद्यस्थितीत कोरोनाबाधित एकूण 5797 रुग्णांमधील तब्बल 5504 म्हणजे 95 टक्के रुग्णांची प्रकृती ठणठणीत आहे. तर अत्यवस्थ रुग्णांची संख्याही तीनशेहून कमी झाली असून 293 वर आली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना संपत आल्याचे चित्र आहे.
मुंबईत मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांत संपूर्ण मुंबईत वेगाने प्रसार झाला. दाटीवाटीची वस्ती आणि गर्दीमुळे अवघ्या काही दिवसांत मुंबईत शेकडो ‘कोरोना हॉटस्पॉट’ निर्माण झाले. दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अडीच हजारांपर्यंत नोंदवली जाऊ लागली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेली ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत केलेले घरोघरी सर्वेक्षण, उपचार, मार्गदर्शन आणि जनजागृती, ‘मिशन झीरो अभियान’, ‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रम यासह कोरोना रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे आता कोरोना पूर्णपणे आटोक्यात आला आहे.
चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह रेट घटला
मुंबईत कोरोना चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण 30 ते 35 टक्क्यांवर गेले होते. हे प्रमाण सद्यस्थितीत 4 ते 6 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 28 लाख 15 हजार 467 चाचण्या करण्यात आल्या असून यातील पॉझिटिव्ह आल्याचे प्रमाण 10.97 टक्के आहे.
अशी आहे सद्यस्थिती
- मुंबईत सद्यस्थितीत एकूण 5797 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यातील 3881 रुग्णांना पॉझिटिव्ह असूनही कोणतीही लक्षणे नाहीत. तर 1623 रुग्णांना सौम्य लक्षणे असली तरी त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही.
- मुंबईत 1 फेब्रुवारीपर्यंत एकूण 3,08,969 कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून यातील 2 लाख 90 हजार 913 जणांना कोरोनावर मात केली आहे. तर 11351 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के झाले असून रुग्णवाढीचा कालावधी 0.12 टक्क्यांवर खाली आला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 564 दिवस झाला आहे.





























































