
झपाटलेला या प्रसिद्ध सिनेमात ‘बाबा चमत्कार’ ही अजरामर भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे पुण्यात राहत्या घरी निधन झाले. ते 83 वर्षाचे होते . त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
वैपुंठ स्मशानभूमीत कडकोळ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कडकोळ यांनी ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. उदरनिर्वाहासाठी वन खात्यात टायपिस्ट म्हणून नोकरी नोकरी करत असताना कडकोळ यांनी रंगभूमीवर पडद्यामागे कलाकारांना निरोप देणे, चहा देणे, खुर्च्या मांडणे अशी मिळेल ती कामे स्वीकारली. ‘करायला गेलो एक’ हे त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक होते. नाटकांच्या दौऱयामुळे त्यांना नोकरीवर पाणी सोडावे लागले होते.
‘झपाटलेला’ या सिनेमाचा उल्लेख निघाला की सर्वपथम आठवतो तो तात्या विंचू आणि त्याला ‘ओम फट् स्वाहा’ हा मृत्युंजय मंत्र देणारा बाबा चमत्कार. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि दिलीप प्रभावळकर यांच्यासह राघवेंद्र कडकोळ यांच्या महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात होत्या. राघवेंद्र कडकोळ यांनी बाबा चमत्कार ही व्यक्तिरेखा वठवली होती. ’झपाटलेला’ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्येही राघवेंद्र झळकले होते.
बालगंधर्व परिवारतर्फे ज्येष्ठ नाटय-चित्रपट अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. कडकोळ यांनी ’ब्लॅक अँड व्हाईट’, ’कुठे शोधू मी तिला, ’गौरी’, ’सखी’ या मराठी चित्रपटांमध्ये, तर ’छोडो कल की बाते’ या हिंदी चित्रपटात काम केले आहे. कडकोळ यांनी ’गोल्ड मेडल’ नावाचे पुस्तकही लिहीले आहे. चित्रपट, नाटक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले.

























































