
पाहुण्या इंग्लंड क्रिकेट संघाने चेन्नई येथे सुरू झालेल्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. सलामीवीर डॉमिनिक सिबलीचे चौथे संयमी अर्धशतक… 100 वा कसोटी सामना खेळणाऱया कर्णधार जो रूटचे खणखणीत विसावे शतक… अन् दोघांनी तिसऱया विकेटसाठी केलेल्या धडाकेबाज द्विशतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंड क्रिकेट संघाने शुक्रवारी 3 बाद 263 धावा फटकावल्या. चेन्नई चेपॉकमधील एम. ए. चिदंबरम स्टेडियमच्या पाटा खेळपट्टीवर हिंदुस्थानी गोलंदाजांची दैना उडाली. जसप्रीत बुमराहने दोन आणि रविचंद्रन अश्विनने एक फलंदाज बाद केला.
संयम अन् आक्रमण
डॉमिनिक सिबली व जो रूट या दोघांनी संयम अन् आक्रमण यांचा मिलाफ दाखवताना इंग्लंडचा धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. जो रूटने 197 चेंडूंत एक षटकार व 14 चौकारांसह नाबाद 128 धावांची आणि डॉमिनिक सिबलीने 286 चेंडूंत 12 चौकारांसह 87 धावांची मौल्यवान खेळी साकारली. हे करताना तो 382 मिनिटे खेळपट्टीवर उभा होता. जसप्रीत बुमराह टाकत असलेल्या दिवसातील अखेरच्या षटकात डॉमिनिक सिबली पायचीत झाला आणि ही जोडी तुटली.
आश्वासक सलामी पण…
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोरी बर्न्स व डॉमिनिक सिबली या सलामी जोडीने आश्वासक सुरुवात करताना संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला. दोघांनीही हिंदुस्थानी गोलंदाजांचे आव्हान परतवून लावले. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 63 धावांची सलामी दिली. रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात तो यष्टिरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद झाला. त्याने दोन चौकारांसह 33 धावा केल्या.
कुलदीप यादवला अंतिम अकरामध्ये स्थान का नाही?
हिंदुस्थानी संघ व्यवस्थापनाने या कसोटीत डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला स्थान न देता शाहबाज नदीमला अंतिम अकरामध्ये संधी दिली. मात्र पहिल्या दिवशी टाकलेल्या 20 षटकांमध्ये शाहबाज नदीमला एकही बळी बाद करता आला नाही. हिंदुस्थानी संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर टीका करण्यात आली.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव – 3 बाद 263 धावा
(रोरी बर्न्स 33 धावा, डॉमिनिक सिबली 87 धावा, जो रूट खेळत आहे 128 धावा, बुमराह 2/40, अश्विन 1/68).
रूटचे विक्रमी शतक
शंभरावा कसोटी सामना खेळणारा इंग्लंडचा कर्णधार जो रूटने चेन्नई कसोटीचा पहिला दिवस सर्वार्थाने गाजवला. 100 व्या कसोटीत शतक साजरे करणारा तो नववाच फलंदाज ठरला आहे. तसेच अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा तिसराच फलंदाज ठरला आहे. याआधी कोलिन काऊड्रे व ऍलेक स्टीवर्ट या इंग्लंडच्या फलंदाजांनी ही कामगिरी केली होती. जो रूटने हिंदुस्थानात खेळलेल्या प्रत्येक कसोटींमध्ये किमान अर्धशतक झळकवण्याची करामत आतापर्यंत केली आहे.
100व्या कसोटीत शतक साजरे करणारे फलंदाज
n कोलिन काऊड्रे (104 धावा, इंग्लंड) विरुद्ध ऑस्ट्रेलिया
n जावेद मियाँदाद (145 धावा, पाकिस्तान) विरुद्ध हिंदुस्थान
n गॉर्डन ग्रिनीज (149 धावा, वेस्ट इंडीज) विरुद्ध इंग्लंड
n ऍलेक स्टीवर्ट (105 धावा, इंग्लंड) विरुद्ध वेस्ट इंडीज
n इंझमाम उल हक (184 धावा, पाकिस्तान) विरुद्ध हिंदुस्थान
n रिकी पाँटिंग (120 धावा, ऑस्ट्रेलिया) विरुद्ध द. आफ्रिका
n रिकी पाँटिंग (नाबाद 143 धावा, ऑस्ट्रेलिया) वि. द. आफ्रिका
n ग्रॅमी स्मिथ (131 धावा, द. आफ्रिका) विरुद्ध इंग्लंड
n हाशीम अमला (134 धावा. द. आफ्रिका) विरुद्ध श्रीलंका
n जो रूट (खेळत आहे 128 धावा, इंग्लंड) वि. हिंदुस्थान

























































