
जम्मू शहरात दहशतवादी धमाके घडवण्याची भयंकर योजना आखणारा ‘लष्कर ए मुस्तफा’चा म्होरक्या हिदायतुल्ला मलिक याच्या मुसक्या अनंतनाग पोलिसांनी जम्मू येथील झटापटीत शनिवारी आवळल्या. मलिक याने थेट पोलिसांवरच हल्ला चढवल्यावर पोलिसांनी त्याच्यावर झडप टाकत त्याला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक ग्रेनेडदेखील हस्तगत करण्यात आला आहे. हिदायतुल्ला मलिकच्या अटकेमुळे दहशतवादी कारवायांशी निगडित महत्त्वपूर्ण माहिती, हिंदुस्थानी लष्कराच्या हाती लागण्याची शक्यता आहे. प्राथमिक चौकशीत अशी माहिती समोर आली आहे की, जम्मूमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याची मलिकची योजना होती. मलिक आपल्या कारमधून जात असताना पोलिसांनी त्याला हटकले आणि त्याने थेट पोलिसांवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. मलिकची कारही जप्त करीत पोलिसांनी पुढील तपासासाठी पाठवली आहे.
























































