राज्य-मुंबईत कोरोनाने मृत्यूचे प्रमाण घटले; राज्यात 30 तर मुंबईत 4 मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य आणि मुंबईत कोरोनाविरोधात राबवण्यात आलेल्या मोहिमांमुळे गेल्या काही दिवसांत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणात घटले आहे. राज्यात आज 30 जणांचा मृत्यू झाला तर मुंबईत दीर्घकालीन आजार असलेल्या चौघांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण 95 टक्के तर मुंबईत हे प्रमाण 94 टक्के इतके मोठे आहे.

कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत दिवसभरात 448 कोरोना रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 711 जण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 572 दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईत 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 11 हजार 390 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या 2 लाख 94 हजार 128वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 94 टक्क्यांवर आले आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 441 वर पोहोचली आहे.

राज्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण 95 टक्क्यांवर
राज्यात दिवसभरात 1 हजार 622 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 95.67 टक्क्यांवर पोहोचला आहे तर 2 हजार 673 कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, राज्यात कोरोना मृत्यूचे प्रमाण घटले असून दिवसभरात 30 जणांचा मृत्यू झाला तर मृत्यूदर 2.51 वर आला आहे.

राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 कोटी 49 लाख 77 हजार 683 चाचण्या झाल्या असून 20 लाख 44 हजार 71 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सध्या 1 लाख 73 हजार 311 जण होम क्वारंटाइन असून 1 हजार 979 जण संस्थात्मक क्वॉरंटाइन आहेत.