टीआरपी प्रकरणाच्या आरोपपत्रात अर्णबविरोधात पुरावा नाही, रिपब्लिक टीव्हीचा हायकोर्टात दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी विरोधात कोणताही पुरावा आढळून आलेला नाही असा दावा आऊटलियर मिडीया कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. तसे प्रतिज्ञापत्र कंपनीच्या वतीने हायकोर्टात सादर करण्यात आले आहे.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करावा यासाठी अर्णबच्या रिपब्लिक टीव्हीने हायकोर्टात याचिका दाखल केली या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अर्णब विरोधात चार्जशीट दाखल केली असून या चार्जशीट विरोधात अर्णबच्या एआरजी आऊटलियर कंपनीने अर्ज दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अर्णबसह कंपनीच्या इतर सहकाऱयांना अडकवले असून राजकीय सूड उगवण्यासाठी सदर आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरण तसेच पालघर मॉबलिंचिंग प्रकरणी निर्भीड पत्रकारिता करण्यात आल्यामुळेच पोलीस रिपब्लिकच्या कर्मचाऱयांना टार्गेट करत आहेत. असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचला रिपब्लिक विरुद्ध कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. एवढेच काय तर पोलिसांनी चौकशी दरम्यान कर्मचाऱयांना टॉर्चर केले असून कंपनीचे सीईओ विकास खानचंदनी यांना इतर कर्मचाऱयांची नावे घेण्याबाबत दबाव आणला जात आहे असेही त्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.