
खोटे लग्न करून नवरदेवाच्या कुटुंबाला लुटणाऱ्या नवरीच्या टोळीचा पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. संबंधित टोळातील 9 महिला आणि 2 पुरूषांना पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने आतापर्यंत 50 पेक्षा जास्त कुटुंबांना लुटले असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. टोळीने नाशिक, पुणे, सोलापूर, गुलबर्गा, वापी आणि कोल्हापूरातील नागरिकांना गंडा घातला आहे.
ज्योती रविंद्र पाटील (वय 35 रा. केसनंद फाटा वाघोली ) असे अटक केलेल्या मुख्य आरोपी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी एका तरूणाने तक्रार दिली आहे. लग्नाचा बनाव रचून लुटणारी टोळी महाराष्ट्रासह गुजरात आणि कर्नाटक राज्यात सक्रिय होती. संबंधित लुटारू महिलांनी आतापर्यंत 50 पेक्षा जास्त पुरूषांना फसवून त्यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर दागिने, पैसे, मौल्यवान वस्तू आणि कपडे घेऊन पोबारा केला आहे. पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे कर्मचारी एका गुन्ह्याचा तपास करीत होते. त्यावेळी तक्रारदाराने ज्योती पाटील ही महिला एका महिन्यापूर्वी भेटली होती. तिने लग्न लावून देण्याचे सांगत तरूणाकडून अडीच लाख रूपये घेतले. लग्नानंतर लग्न केलेल्या मुलीने तक्रारदाराच्या घरातून अडीच लाख रूपये घेऊन पळ काढला होता.
संबंधित प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी महिलेच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आरोपी मुख्य महिला ज्योती विवाहीत असून, तिला दोन मुले असल्याचे सांगितले. त्यानंतर लग्नाचा बनाव करून राज्यासह परराज्यात लुट करणाऱ्या टोळीचे बिंग फुटले. या प्रकरणी पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट तपास करीत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अभिनव देषमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक रामेशवर धोंडगे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जगताप, एस.के.पठाण , राजेंद्र थोरात, आर.बी.पुणेकर, एम.जी.अयाचित, एस.जे.चंद्रशेखर, पी.एच.घाडगे, एस.पी.नाईकनवरे, एस.पी.अहिवळे, ए.ए.नवले, एल.पी.जगताप, पी.जी.कांबळे, सोनल धुमाळ यांच्या पथकाने केली.
लग्नाच्या बहाण्याने वयस्क तरूणांची फसवणूक
टोळीतील मुख्य आरोपी ज्योती विवाह न जमलेल्या वयस्कर तरूणांकडुन रोख 2 ते 3 लाख रूपये घेत होती. त्यानंतर तिच्या संपर्कात असलेल्या स्त्रियांसोबत लग्न लावून देत होती. त्यानंतर लग्न झालेली स्त्री संबंधीत पुरूषाकडे आठ दिवस राहिलेनंतर माहेरी जात होती. त्यानंतर पुन्हा महिला नांदायला परत येत नव्हती. अनेकांनी अबु्रसाठी तक्रार दिली नसल्याचे तपासात उघड झाले आहे.

































































