क्रिकेटचे नियम आता मराठीत, प्रणव जोशींनी लिहिले पुस्तक मॅरीलेबोन क्रिकेट क्लबकडून मान्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • जयेंद्र लोंढे 

क्रिकेट या खेळाचे नियम आता मराठी भाषेमध्ये वाचता येणार आहेत. ठाण्याचे 42 वर्षीय प्रणव जोशी यांच्या ‘‘क्रिकेटचे कायदे’ या मराठी पुस्तकाला मॅरीलेबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) यांच्याकडून गुरुवारी मान्यता देण्यात आली असून आता याचा फायदा मुंबई, महाराष्ट्रासह जगातील सर्व हिंदुस्थानींना होणार आहे. पंच म्हणून करीअर करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. चोहोबाजूंनी प्रणव जोशी यांच्या कामगिरीवर कौतुकांचा वर्षाव करण्यात येत आहे. यावेळी दैनिक ‘सामना’ने प्रणव जोशी यांच्याशी संवाद साधला. पंच अभ्यासासाठी भाषेचा अडथळा येत होता. त्यामुळे मराठीमधून पुस्तक लिहिल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

अभिमानास्पद बाब

मुंबईतून आंतरराष्ट्रीय स्तरावर दिग्गज क्रिकेटपटू घडले, पंच तयार झाले. ही गोष्ट कौतुकास्पद आहे. पण याच हिंदुस्थानी क्रिकेटच्या पंढरीतून क्रिकेटचे नियम मराठीतून लिहिणारी व्यक्ती तयार झाली ही बाब अभिमानास्पद आहे. प्रणव जोशी यांनी उत्कृष्ट लेखन केले आहे. आता याचा फायदा सर्वांनाच होणार आहे, असे अजित दातार यावेळी म्हणाले.

तीन वर्षांचा कालावधी

प्रणव जोशी यावेळी म्हणाले, 2017 सालापासून मी क्रिकेटच्या नियमांवर आधारित पुस्तक लिहायला सुरुवात केले. काही नियमांमध्ये बदलही करण्यात आला. त्यामुळे गेल्या वर्षी मलाही माझ्या पुस्तकात बदल करावा लागला. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये हे पुस्तक पूर्ण झाले. हे पुस्तक लिहायला तीन वर्षे लागली. शेवटी गुरुवारी एमसीसीकडून या पुस्तकाला मान्यता मिळाली, असे भावुक उद्गार यावेळी पुढे त्यांनी काढले.

प्रणव जोशी कोण?

प्रणव जोशी हे 42 वर्षांचे असून ते ठाण्यात वास्तव्य करतात. वयाच्या 24 व्या वर्षी ते मुंबई क्रिकेट पंचगिरीशी जोडले गेले. तसेच 2013 सालापासून ते बीसीसीआयशी संलग्न आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये त्यांनी पंचगिरी केली आहे. पंचसहीत ते इन्श्युरन्सशी संबंधित काम करीत आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून आयोजित करण्यात येणाऱया पंच अभ्यासाकरिता शिकवणीसाठी प्रणव जोशी यांची निवड केली जाते. यावेळी हा अभ्यास करताना अडचण निर्माण होत होती. त्यामुळे त्यांनी यावर पुस्तक लिहून असंख्य युवकांचा मार्ग सुकर केला आहे. क्रिकेटच्या मूळ नियमांवर आधारित हे पुस्तक 120 ते 122 पानांचे आहे.

अजित दातार यांनी पडताळले

बीसीसीआयसाठी काम करणारे अजित दातार यांनी यावेळी प्रणव जोशी यांचे पुस्तक ‘वेरीफाय’ अर्थातच पडताळले. दोघांमध्ये या कालावधीत काही सेशनही झाले. त्यानंतर एमसीसीकडून या पुस्तकाला मान्यता देण्यात आली.