दहा महिन्यांची प्रतीक्षा संपली, सोमवारपासून राणी बागेचे दरवाजे उघडणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे गेल्या तब्बल दहा महिन्यांपासून बंद असलेले पालिकेचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय सोमवार, 15 फेब्रुवारीपासून पर्यटकांसाठी खुले होणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज मंजुरी दिली असल्याचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले. राणी बाग पर्यटकांसाठी खुली होणार असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व खबरदारी घेतल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर लागलेल्या लॉकडाऊनमुळे राणी बाग पर्यटकांसाठी बंद करण्यात आली, मात्र सद्यस्थितीत मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. विशेष म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी सर्वसामान्यांसाठी ठरावीक वेळेत रेल्वे सुरू होऊनही कोरोना आटोक्यात आहे. त्यामुळे मुंबईसह राज्य-देशातील पर्यटकांना राणी बाग कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लागून राहिली होती. राणी बाग सुरू करण्यासंदर्भात संबंधित विभागाकडून पालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला पालिका आयुक्तांनी अखेर आज मंजुरी दिली. दरम्यान, राणी बागेत पेंग्विन आणल्यापासून पर्यटकांची संख्या वाढली असून 15 ते 20 हजारांपर्यंत मिळणारे उत्पन्न दररोज एक लाखापासून सहा लाखांपर्यंत गेले आहे. यामध्ये सरासरी उत्पन्न प्रतिदिवस दीड लाख आणि महिना सरासरी 45 लाखांवर गेले आहे. मात्र गेल्या दहा महिन्यांपासून राणी बाग बंद असल्याने प्रतिदिवस दीड लाखाचा महसूल बुडत होता. मात्र आता राणी बाग सुरू होत असल्यामुळे पालिकेला बुडणारा महसूल मिळणार आहे. कोविड-19 विषयक सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले असून विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, 5 वर्षांखालील मुले यांनी शक्यतो भेट देणे टाळावे किंवा विशेष काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेने केले आहे.

नियमित वेळ, स्वच्छता, सॅनिटायझेशन, काळजी

राणी बागेची नियमित वेळ असलेल्या सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच राणी बाग खुली ठेवण्यात येणार आहे. यामध्ये प्राणी-पक्ष्यांच्या पिंजऱयांजवळ, तिकीट खिडकीजवळ सुरक्षित अंतराचे मार्पिंग करण्यात आले आहे. तर ठिकठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. शिवाय प्राण्यांचे पिंजरे पारदर्शक काचांचे असल्यामुळे प्राण्यांची आणि पर्यटकांची सुरक्षितता जपली जाणार असल्याची माहिती राणी बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली..

गर्दी झाली तर गेट बंद

मुंबईत सद्यस्थितीत कोरोना कमी झाला असला तरी पूर्णपणे गेला नसल्यामुळे राणी बागेत सध्या तरी गर्दी टाळली जाणार आहे. सद्यस्थितीत दिवसभरात केवळ पाच ते सहा हजार पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. यापेक्षा जास्त पर्यटक आल्यास प्रवेश देणे बंद करण्यात येईल. राणी बागेत नियमितपणे पाच ते सहा हजार तर शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या 15 हजारांपर्यंत जाते.