
तुटलेल्या हाताला पुन्हा शस्त्रक्रियेने जोडण्याची कमाल दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केली आहे. अत्यंत आव्हानात्मक, गुंतागुंतीची अशी शस्त्रक्रिया डॉक्टरांनी शनिवारी केली.
नवी दिल्ली येथील प्रल्हादपूर औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱया 36 वर्षीय इंद्रपाल या कामगाराच्या हातावर मशीनपेक्षा जड अशी वस्तू पडली. त्यामध्ये इंद्रपालचा डावा हात तुटला. तो अत्यंत वेदनेने तडफडत होता आणि खूप रक्तस्त्र्ाावदेखील झाला. बेशुद्धावस्थेत त्याला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. त्याचा तुटलेला हात बर्फात ठेवण्यात आला. हाताची अवस्था बिकट होती. हात छिन्नविछिन्न झाला होता. हाडं, पेशी, रक्तवाहिन्या यांना मोठी दुखापत झाली होती. प्रत्येक मिनिट महत्त्वाचा होता. कोविड चाचणीचा अहवाल येण्याची वाट न बघता डॉक्टरांनी सर्जरी करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती प्लास्टिक अँड रिकंस्ट्रक्टिव्ह सर्जरी विभागचे ज्येष्ठ सल्लागार डॉ. अनुभव गुप्ता यांनी दिली. दुखापत गंभीर असल्यामुळे मायक्रोवॅस्क्युरल तंत्राचा वापर केल्याने सहा तासांपेक्षा कमी वेळ सर्जरीसाठी लागल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले. इंद्रपालचा हात वाचला आहे. हात लवकरच पूर्वीप्रमाणे काम करू लागेल, अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केली.

























































