ठरलं! रणवीरचा ’83’ या दिवशी होणार प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना लॉकडाऊनमुळे ठप्प झालेले अनेक उद्योग आता हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. बॉलिवूडही त्याला अपवाद नाही. 2020मध्ये अनेक महत्त्वाकांक्षी, बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट रांगेत झळकणार होते. पण, कोरोनामुळे ते सगळे रद्द झाले होते. आता हळूहळू एकेका चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होताना दिसत आहे.

चित्रपटगृहे उघडल्यानंतर आता बॉलिवूडमध्येही चैतन्य वाहू लागलं आहे. आता प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेले अनेक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यात अक्षय कुमार याच्या बेल बॉटमनंतर रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित ’83’ हा चित्रपटही आहे.

83च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत जगज्जेता ठरलेल्या हिंदुस्थानी संघाने इतिहास रचला होता. त्या ऐतिहासिक क्षणाचा पुनर्प्रत्यय या चित्रपटाच्या निमित्ताने घडणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. ही उत्सुकता लक्षात घेऊनच यंदाच्या जून महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. 4 जून 2021रोजी हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेता रणवीर सिंग याने सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे.

या सिनेमात रणवीर सिंग हा कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. त्या व्यतिरिक्त सुनिल गावस्कर यांच्या भूमिकेत ताहीर राज भसीन, संदीप पाटील यांच्या भूमिकेत चिराग पाटील, कीर्ती आझाद यांच्या भूमिकेत दिनकर शर्मा, रॉजर बिन्नी यांच्या भूमिकेत निशांत दहिया, मदन लाल यांच्या भूमिकेत हार्डी संधू, सैयद किरमानी यांच्या भूमिकेत साहिल खट्टर, बलविंदर यांच्या भूमिकेत अॅमी विर्क, दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे, रवि शास्त्री यांच्या भूमिकेत धैर्य करवा, सुनील वॉल्सन यांच्या भूमिकेत आर. बद्री आणि पीआर मान सिंह यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी दिसणार आहेत.

या चित्रपटाची सहनिर्माती असणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण ही कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा हिंदी व्यक्तिरिक्त तमिळ आणि तेलुगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे. हिंदुस्थानी क्रिकेट विश्वातील एका इतिहासाच्या कथा सांगणारा ’83’ हा चित्रपट कबीर खान यांनी दिग्दर्शित केला आहे.