
कोणतीही करवाढ नसलेला सातारा नगरपालिकेचा 307 कोटी 47 लाखांच्या अंदाजपत्रकास अर्थसंकल्पीय सभेत मंजुरी देण्यात आली. या अर्थसंकल्पात महसुली अनुदानातून या आर्थिक वर्षात नगरपालिकेस 34 कोटी 43 लाख रुपये मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला असून, त्याबाबतच्या तरतुदी आणि योजनांची माहिती उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी सादरीकरणादरम्यान दिल्या.
नगरपालिकेची अर्थसंकल्पीय सभा ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली होती. सभा सुरू झाल्यानंतर नगराध्यक्षा माधवी कदम यांनी सदस्यांसमोर नगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांत झालेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. हा लेखाजोखा मांडतानाच त्यांनी यंदाचा अर्थसंकल्प हा आपल्या कार्यकारिणीचा शेवटचा असल्याने तो मंजूर करण्याची विनंती सर्वांना केली. यानंतर लेखाधिकारी आरती नांगरे यांनी अर्थसंकल्पातील काही गोषवाऱयाचे तसेच आलेल्या उपसूचनांचे वाचन केले. हे वाचन संपल्यानंतर उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी अर्थसंकल्पाच्या सादरीकरणास सुरुवात केली.
विविध योजनांमधून मिळणाऱया निधीतून कोणकोणत्या कामासाठी तसेच विभागासाठी या आर्थिक वर्षात किती आर्थिक तरतूद केली आहे याची माहिती त्यांनी दिली. माहिती देत असतानाच येणाऱया सूचना आणि उपसूचनांची नोंद घेत त्याला उत्तरे देत अर्थसंकल्पीय सभेचे कामकाज सुरू ठेवले.
मालमत्ता कर, पाणीकर, विशेष स्वच्छता कर, अग्निशमन कर, हद्दवाढीतील महसूल, इमारत भाडे, हातगाडा फी, नाटय़गृह भाडे, विकास कर, मंडई फी, महसुली, भांडवली अनुदाने यातून नगरपालिकेस या वर्षात 307 कोटी 4 लाख 66 हजार 424 रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज शेंडे यांनी सभेत वर्तवत सभेचे कामकाज पूर्ण केले. दरम्यान, अर्थसंकल्पातील तरतुदींना विरोधी गटांनी हरकती घेतल्या आहेत.

























































