
जालना जिल्ह्यातील श्रीक्षेत्र राजूर येथील राजुरेश्वराच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जिल्हाभरासह परजिल्ह्यातील अनेक गणेशभक्त येतात. 2 मार्चला आलेल्या अंगारिका चतुर्थीला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेत कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी बाजारपेठ बंद ठेवत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय व्यापारी संघटनेने घेतला आहे.
राजूर पोलीस चौकीत सहायक पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी व्यापारी, ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. यावेळी दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत असून मंगळवारी अंगारिका चतुर्थी येत असल्याने भाविकांची होणाऱ्या गर्दीबाबत चर्चा करण्यात आली. गणेशभक्तांसाठी अंगारिका चतुर्थी विशेष महत्वाची मानली जाते. अंगारिकेला लाखो भाविकांची गर्दी होते. मंदिर प्रशासनाने गर्दी होऊ नये, यासाठी दोन दिवस राजूरेश्वर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही जिल्हाभरातून भाविक पायरीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करू शकतात.
गर्दी वाढल्यास बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंग पाळणे कठीण होणार आहे. त्यासाठी व्यापारी, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन व ग्रामस्थांनी मंगळवारी जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून उपाययोजना राबवल्या जात असल्या तरी ग्रामस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने रूग्णसंख्येत भर पडत असल्याचा सूर अनेकांनी व्यक्त केला. कोरोनाला गावच्या बाहेर ठेवण्यासाठी मंगळवारी जनता कर्फ्यू आवश्यक असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. यावेळी सरपंच भाऊसाहेब भुजंग, तंटामुक्तीचे अध्यक्ष श्रीरामपंच पुंगळे यांच्यासह व्यापारी व नागरिकांची उपस्थिती होती.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहे. पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अंगारिका चतुर्थी असल्याने भाविक भक्तांसह नागरिकांनी एकत्र येऊ नये. सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. तसेच व्यापारी, ग्रामस्थांनी जनता कर्फ्यूचा घेतलेला निर्णय स्वागर्ताह आहे, असे हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीखक संतोष घोडके यांनी सांगितले.



























































