
कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका बसला. मात्र या काळात अब्जाधिशांची संख्याही वाढली. देशामध्ये अब्जाधिशांची संख्या 177 झाली. त्यात 40 नव्या अब्जाधिशांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे अब्जाधिशांच्या यादीमध्ये सर्वाधिक 60 जण मुंबईतील आहेत. ‘हुरन ग्लोबल रीच लिस्ट 2021’ ने जगातील श्रीमंतांची ताजी यादी नुकतीच जाहीर केली. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. देशातील 177 अब्जाधिशांमध्ये नवी दिल्लीतील 40 तर बंगळुरूमधील 22 उद्योगपतींचा समावेश आहे. अर्थातच देशात सर्वात श्रीमंत हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी आहेत. 2020 मध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये (पान 1 वरून) 24 टक्क्यांनी वाढ झाली.
जगातील धनकुबेरांमध्ये अंबानींचा आठवा क्रमांक
जगातील धनकुबेरांमध्ये मुकेश अंबानींचा आठवा क्रमांक लागला आहे. त्यांची एकूण संपत्ती 6.1 लाख कोटी रुपये इतकी आहे. गेल्या वर्षी ते नवव्या क्रमांकावर होते. त्यावेळी त्यांच्या संपत्तीचा आकडा 4.8 लाख कोटी रुपये होता.
अॅलन मस्क जगात नंबर वन
तेसला मोटर्स, स्पेसएक्स अशा नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे संस्थापक अॅलन मस्क हे जगातील सर्वाधित श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. 49 वर्षीय मस्क यांची संपत्ती 14.46 लाख कोटी रुपये इतकी आहे. गेल्या वर्षी त्यांच्या संपत्तीमध्ये 328 टक्क्यांनी वाढ झाली.
जगातील पाच सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती
अॅलन मस्क (तेसला मोटर्स)- 14.46 लाख कोटी रुपये
जेफ बेजोस (अॅमेझॉन)- 13.88 लाख कोटी रुपये
बर्नार्ड अर्नाल्ट (लुईस व्हिटन)- 8.37 लाख कोटी रुपये
बिल गेट्स (मायक्रोसॉफ्ट)- 8.07 लाख कोटी रुपये
मार्प झुकेरबर्ग (फेसबुक)- 7.42 लाख कोटी रुपये
गौतम अदानींची संपत्ती झाली दुप्पट
गुजरातचे उद्योगपती गौतम अदानी यांची संपत्ती 2020 मध्ये दुपटीने वाढली. त्यांची संपत्ती 2.34 लाख कोटी रुपये झाली आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत त्यांनी यंदा 20 पायऱया वर चढत 48 वा क्रमांक पटकावला आहे.
देशातील पाच सर्वाधिक श्रीमंत
मुकेश अंबानी – 6.1 लाख कोटी रुपये
गौतम अदानी – 2.34 लाख कोटी रुपये
शिव नाडर – 1.94 लाख कोटी रुपये
आर्सेलर मित्तल – 1.4 लाख कोटी रुपये
सायरस पुनावाला – 1.35 लाख कोटी रुपये




























































