
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाच्या निर्देशानुसार शनिशिंगणापूर येथे येत्या 13 मार्च रोजी दर्श शनिअमावास्येनिमित्त भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे, तसेच यात्रा काळातील शुक्रवार व शनिवार हे दोन दिवस मंदिर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
शनिशिंगणापूर येथे देवस्थान प्रशासन, ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
शनिअमावास्येनिमित्त पाच ते सहा लाख भाविक शनैश्वरांच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. मात्र, सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाच्या निर्देशानुसार खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी भरणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी (दि. 12) अमावास्येला प्रारंभ होत असल्याने गर्दी लक्षात घेता, शुक्रवार व आमवास्येचा मुख्य दिवस शनिवारी मंदिर पूर्णपणे बंद राहणार आहे. शनिअमावास्येच्या दिवशी शनी देवाची महाआरती व महापूजा मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, चिटणीस अप्पा शेटे, कार्यकारी अधिकारी नितीन शेटे, सरपंच बाळासाहेब बानकर, पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्यासह विश्वस्त मंडळ उपस्थित होते.























































