
मुंबईत एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी 11 मार्च 2020 रोजी मुंबईत पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. यानंतर जून ते सप्टेंबरपर्यंत कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. मात्र पालिकेने केलेल्या प्रयत्नांमुळे कोरोना आटोक्यात आहे. गेल्या वर्षभरात पालिकेने कोरोना लढय़ावर 1600 कोटी रुपये खर्च केले आहेत. मुंबईत आतापर्यंत 35 लाख चाचण्या करण्यात आल्या असून यामध्ये 9.64 टक्के म्हणजेच 337123 बाधित आढळले आहेत. कोरोनाविरोधातील लढा अजूनही सुरूच आहे.
मुंबईत गेल्या वर्षी 11 मार्च रोजी कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच काही दिवसांतच मुंबईत अनेक कोरोना हॉटस्पॉट निर्माण झाले. या काळात मुंबईतील बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने 36 टक्के नागरिकांना विलगीकरणात राहावे लागले होते. मुंबईतील अडीज टक्क्यांहून अधिक नागरिकांना आतापर्यंत कोविडची बाधा झाली आहे. पालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम, घरोघरी तपासणी, सर्वेक्षण, उपचार आणि जनजागृती केल्यामुळे कोरोना आटोक्यात आला. मात्र फेब्रुवारीच्या मध्यावर मुंबईत पुन्हा रुग्णवाढ होऊ लागल्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेने प्रभावी उपाययोजना आणि खबरदारी नियमांच्या कठोर अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. मुंबईकरांनीही कोरोना रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची खबरदारी घ्यावी असे आवाहनही पालिकेने केले आहे.
वर्षानंतरची स्थिती
- एकूण बाधित – 337123
- कोरोनामुक्त – 313346
- मृत्यू – 11511
- सक्रिय रुग्ण – 11379
- लक्षणे नसलेले – 6878
- लक्षणे पण प्रकृती स्थिर – 4128
- अत्यवस्थ – 373
पालिकेने 191 कोविड येद्धे गमावले
कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे सर्वजण घरात अडकून पडले असताना पालिकेचे कर्मचारी मात्र मुंबईकरांसाठी आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावत होते. यामध्ये आतापर्यंत पालिकेच्या 191 कर्मचारी-अधिकाऱयांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. ‘बेस्ट’च्याही 50 हून जास्त कर्मचाऱयांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. कोरोनावर मात करून पालिकेचे हजारो कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहेत.
वेरुळ, अजिंठय़ासह संभाजीनगरातील पर्यटनस्थळे बंद; अंत्यसंस्कारालाही केवळ 20 जणांची उपस्थिती
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सुधारित आदेश जारी केले असून त्यानुसार अंशतः लॉकडाऊनच्या काळात जिह्यातील वेरूळ, अजिंठय़ासह सर्व ऐतिहासिक वास्तू बंद ठेवण्यात येतील, खासगी संस्थांना आरटीपीसीआर चाचण्या खासगी लॅबमधून कराव्या लागतील आणि अंत्यसंस्कारासाठी 20 पेक्षा अधिक नातेवाईक उपस्थित राहू शकणार नाहीत.
दिवसभरात दीड हजार रुग्ण; पुणेकरांची चिंता वाढली
शहरात नवीन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणात वाढ होत असून, गुरुवारी (दि.11) शहरातील नवीन रुग्णसंख्येने तब्बल दीड हजाराचा आकडा पार केला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात जवळपास शंभर ते दीडशेच्या घरात आलेल्या रुग्णसंख्येत मागील महिन्यापासून झपाटय़ाने वाढ होत असून, ही वाढ पुणेकरांसाठी पुन्हा चिंताजनक ठरत आहे. शहरात आटोक्यात आलेल्या रुग्णसंख्येत 13 फेब्रुवारीपासून पुन्हा वाढ होत आहे. मागील वर्षी 16 सप्टेंबर रोजी उच्चांकी 2 हजार 120वर पोहोचलेली रुग्णसंख्या शंभरच्या आतपर्यंत नियंत्रित आणण्यात प्रशासनाला यश आले होते. मात्र, गेल्या एक महिन्यापासून पुन्हा या रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. महापालिकेच्या रिपोर्टनुसार गुरुवारी पुणे शहरात 1 हजार 504 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर, बरे झालेल्या 675 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. दिवसभरात शहरात 13 जणांचा मृत्यू झाला असून, यात पुण्याबाहेरील 6 जणांचा समावेश आहे.

























































