
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे जातवैधता प्रमाणपत्र खोटे असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या शिवसिद्ध बुळ्ळा याच्या घर झडतीत सापडलेल्या कागदपत्रांतून नवनवीन खुलासे होत आहेत. बुळ्ळा याच्या घरात आढळलेल्या एका कागदपत्राद्वारे 2015च्या प्रकरणातदेखील त्याला आरोपी करण्यात आले आहे.
शिवसिद्ध बुळ्ळा हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र, पोलिसांना चौकशीत बुळ्ळाच्या घरातून सापडलेल्या कागदपत्रांतून रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्याच्या सोलापुरातील दोन आणि अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील एका घरात शोध घेण्यात आला. आरोपी शिवसिद्ध बुळ्ळा याच्या घरातून नितीन साळुंखे नावाच्या व्यक्तीचा एक दाखला आढळून आला. 2015 साली सुमारे 200 बनाकट जात प्रमाणपत्र तयार केल्याप्रकरणी जात पडताळणी समितीने पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. या दाखल्यांपैकी एक दाखला नितीन साळुंखे यांचा होता. जात पडताळणी समिती कार्यालयात काम करणाऱया दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी असलेली एक महिला बुळ्ळा याच्या फ्लॅटमध्ये भाडय़ाने राहात होती. त्यामुळे 2015च्या प्रकरणातही बुळ्ळा याला आरोपी करण्यात आले आहे. यासोबतच बुळ्ळा याची मुलगी, भावजय आणि गावातील एका व्यक्तीचे जातीचे दाखलेदेखील गुन्हे शाखेला मिळाले होते. मात्र, गुन्हे शाखेने अक्कलकोट तहसीलदारांना या दाखल्यांबाबत माहिती किचारली असता या दाखल्यांसंदर्भात कोणतीच नोंद नसल्याचे उघड झाले आहे.
तक्रार अर्ज आणि दाखल्यावरील अक्षरात साम्य
– खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला हरवल्याची तक्रार शिवसिद्ध बुळ्ळा यानेच वळसंग पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांना दिलेल्या अर्जात आणि खासदारांच्या दाखल्यावरील अक्षरात साम्य आढळल्याच्या संशयातून पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, अटकेवेळी त्याच्या घरात अक्कलकोटच्या तहसीलदारांचे शिक्केदेखील आढळले आहेत. त्यामुळे शिवसिद्ध बुळ्ळा याने या शिक्क्यांचा वापर करून किती बनावट दाखले तयार केले असतील, याचा अंदाज बांधणे कठीण आहे.






























































