
>> अरुणा सरनाईक
‘यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः’ अर्थात ज्या ठिकाणी स्त्री पूजनीय आहे, तिथे देवतांची वस्ती असते. म्हणजेच तिथे भरभराट असते, प्रगती असते. अशा अर्थाने तिचे पूजन तर होते पण मुखवट्यामागे बरंच काही दडलं आहे. अशा पुस्तकी स्वातंत्र्याच्या घोषणा न करता समान वागणूक, समान स्वातंत्र्य आणि स्त्री म्हणून सन्माननीय दर्जा तिला मिळायला हवा.
आजचा काळ काही अंशी बदललेला आहे. स्त्रीतल्या सामर्थ्याची सृजनशीलतेची जाणीव पुरुष हळूहळू मान्य करू लागला आहे. ती जननी आहे. तिला स्वतःच्या वैशिष्टय़ांसकट स्वतःचा विकास करण्याचा हक्क मिळाला पाहिजे. तरच त्याचा उपयोग समाजाच्या विकासासाठी होईल. कारण पुरुष झाला तरी तो आपल्या जीवनाची सुरुवात मातेच्या उदरातूनच करतो. स्त्री ही जीवनाचा आरंभ आहे. तिच्यातून जीवन सुरू राहतं. जिथे जीवनाचा उगम, तिथे सृजनशीलता असतेच असते. स्त्रीच्या ठायीही ती असतेच, पण या निर्मातीला तिच्यातून जन्मलेला पुरुष मोठेपणी विसरून तिच्यावरच अत्याचार करायला कसा सरसावतो हा विचार करायला भाग पाडणारा प्रश्न आहे.
‘यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः’ अर्थात ज्या ठिकाणी स्त्री पूजनीय आहे, तिथे देवतांची वस्ती असते. म्हणजेच तिथे भरभराट असते, प्रगती असते. आज स्वातंत्र्यानंतरही हिंदुस्थानसारख्या महासत्ता होण्याच्या मार्गावर असलेल्या देशात स्त्रियांची अवस्था बिकट आहे. कानीकपाळी ओरडा असूनही स्त्रियांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. दैनिकांत रोजच स्त्री अत्याचाराच्या बीभत्स बातम्या मनाला हादरवून टाकतात. छत्रपतींच्या देशात त्यांच्या काळात अत्याचारातून सुटका झालेली स्त्री जरा कुठे मोकळा श्वास घेते न घेते तोच इंग्रजांचे अत्याचार आणि आता आपल्याच स्वतंत्र देशात इतक्या वर्षांपासून होणारे अत्याचार ती मुकाटपणे सोसते आहे. तिने आवाज उठविला नाही असं नाही, पण ते कायमचे बंद झाले नाही हे खरे आहे. काही अंशी ती पीडितच राहिली हे खरंय. आज परिस्थितीत थोडाफार फरक जाणवतो. शेकडो वर्षे स्त्रियांना दडपलं गेल्यामुळे त्यांच्यात गुणवत्ता नाही, पुवत नाही असं नाही, पुरुषांप्रमाणे संधी तिला कमी प्रमाणात उपलब्ध झाली.
पुरुष आणि प्रकृती एकाच नाण्याच्या दोन बाजू. एकमेकांचे प्रतिस्पर्धी नाहीतर पूरक आहेत. पुरुषांच्या अर्ध्या अंगापासून देवानं स्त्री निर्माण केली. स्त्री पूर्णत्व, तर पुरुष मात्र अपूर्ण झाला. त्याच्या शरीराचे एक अर्धांग पूर्णांग होऊन स्त्रीरूपात त्याच्या प्रत्येक कार्यात, मग ते धार्मिक असो वा सामजिक, तिचा सहभाग अनिवार्य मानला गेला. मग आपल्याच अर्धांगावर पुरुष करीत आलेले अत्याचार स्तिमित करतात.
पुरुषांच्या तुलनेत तिला विनोदाचे अंग फारच कमी आहे असं म्हणतात. विनोद निर्मिती या विश्वामध्ये झाली ती मानवाच्या उत्क्रांतीची शेवटची पायरी. मानवाव्यतिरिक्त कोणत्याही प्राण्यामध्ये विनोदबुध्दी आणि हास्य नाही. या दोन गोष्टी देवानं मानवाला दिलेल्या अनमोल भेटी आहेत हे खरं आहे. आजपावतो स्त्रियांमधून महान चित्रकार, महान कवी किंवा संगीतकार, शिल्पकार आढळत नाही. राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, पंतप्रधान इंदिरा गांधी, रमाबाई रानडे सावित्रीबाई फुले यांसारख्या अनेक स्त्रीरत्नांनी आपला इतिहास झगमगता आहे. विनोदी कथाकार, विनोदी नट म्हणून फारशा जरी प्रसिध्द नसल्या तरी यांना जन्म देणाऱया या स्त्रियाच होत्या ना! प्रख्यात नट चार्ली चॅप्लिन आपल्या सर्व यशाचं श्रेय आपल्या आईला देत असे. कारण त्याची आई पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून आपले दुःख लपवत आपली हसरी कला रंगमंचावर सादर करीत असे आणि म्हणूनच चार्लीच्या विनोदाला करुणेची झालर असायची.
स्त्री ही जीवनाचा आरंभ आहे. तिच्यातून जीवन सुरू राहतं ती जननी आहे. जिथे जीवनाचा उगम, तिथे सृजनशीलता असतेच असते. म्हणून पुरुषांपेक्षा स्त्रीमध्ये ही शक्ती अधिक्यानं आहे. काही महान पुरुषांमध्ये, संतांमध्ये ममत्व जास्त आढळते. संतांना तर माऊली म्हटलं जातं. त्यांच्यामध्ये कुठेतरी स्त्रियांची कोमलता जास्त असते, मातृभाव अधिक असतो, जो की, स्त्रीत्वाचा फार मोठा अलंकार मानला गेलेला आहे. काही वेळेस परखडपणे महत्त्वाचे निर्णय ती सहजतेने घेऊन जाते. तिच्यातील या शक्तीची जाणीव पुरुषाला चांगलीच आहे. म्हणूनच तो तिला वरचढ होऊ द्यायला पाहत नाही.
मुलगी असतांना वडिलांवर अवलबूंन राहावं, तरुण वयात, लग्नानंतर पतीवर, म्हातारवयात मुलावर अवलबूंन राहावं अशी तिची फार पूर्वीपासून धारणा करून देण्यात आलेली होती आणि आपल्या धर्मग्रंथांतून त्याची महती वर्णित करून त्याला सामजिक मान्यता आणि धर्माचा भरपूर पाठिंबा दिला गेलेला होता. हा स्त्रीचा जीवनक्रम कित्येक दशकं चालू होता.
मनुष्याला उत्क्रांतीच्या वेळी ज्या प्रक्रियेतून जावं लागलं त्याच प्रक्रियेतून उदरस्थ शिशूला जावं लागतं. काही वर्षांचा प्रवास हा त्या नऊ महिन्यांत समाविष्ट असतो. कोणतीही जबाबदारी नाही, अगदी श्वास घेण्याचीसुध्दा नाही. आई श्वास घेते, अन्न पुरविते, तुमचे पोषण करते. केवळ शरीर पोषण नाही, तर उत्तम संस्कार देत मनाची मशागत करते. मग ती ईश्वरापेक्षा कमी महत्त्वाची कशी! कारण आपण सर्वच त्याचे अंश आहोत अशी धारणा आपली करून दिलेली आहे.
ईश्वर जसा सृष्टीची निर्मिती करतो, जीव निर्माण करतो, प्रतिपाळ करताना तो मातेच्या ममतेने, प्रेमळपणानं संगोपन करतो, तोच भाव उदरस्थ शिशूला वाढवताना स्त्रीचा असतो. ही तिची सृजनशीलता निश्चितच स्पृहणीय आहे. यावेळी ती मुक्त असते कोणत्याही बंधनात, कोणत्याही पुरुषी अत्याचाराला न जुमानता ती उदरस्थ शिशूचे, तो पुरुष आहे किंवा स्त्री अर्भक आहे याचा विचार न करता संगोपन करते. अशा निर्मातीला तिच्यातून जन्मलेला पुरुष मोठेपणी विसरून तिच्यावरचं अत्याचार करायला कसा सरसावतो? हजारो पिढय़ा, हजारो दशकं उलटली तरी अत्याचाराचं प्रमाण पूर्णतः नाहीस झालेलं नाही असं खेदानं म्हणावं लागतं.
पुस्तकी स्वातंत्र्याच्या घोषणा न करता समान वागणूक, समान स्वातंत्र्य आणि स्त्री म्हणून सन्माननीय दर्जा तिला मिळाला तर? स्त्रिया आत्मसाक्षात्कारी बनतील, योगी बनतील, महान कवी बनतील, चित्रकार बनतील. केवळ स्वतःचा विकास न करता जगाच्या विकासाला पुरुषांच्या बरोबरीने हातभार लावतील. त्यांचं स्वत्व त्यांना बहाल केलं गेलं तर स्त्री-पुरुष दोघांचाही फायदा होईल आणि ज्यांनी हे पाऊल उचललं आहे त्यांना खरोखरच फायदा झाल्याचं लक्षात आलेलं आहे. पुरुष आणि स्त्री, प्रकृती आणि पुरुष एकमेकांना सहायक आहेत. त्यांनी एकत्र येऊन काम केल्यास होणारी प्रगती आकाशाला गवसणी घालते आहे. याचे उदाहरण म्हणून आपण सुनीता विल्यम, कल्पना चावला अशा स्त्रीरत्नांची नावं आदरानं आणि अभिमानानं घेता येतात.


























































