
इंग्रजांच्या काळात राणीच्या सफरीसाठी होणारी व्हिक्टोरिया बग्गी आता मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. विशेष म्हणजे घोडय़ांद्वारे चालवली जाणारी ही गाडी आता पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणार आहे. या व्हिक्टोरिया सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आला.
मुंबईत ‘वर्षा’ निवासस्थानी करण्यात आलेल्या शुभारंभावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, परिवहनमंत्री ऍड. अनिल परब आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बग्गीची माहिती घेतली आणि या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते बग्गीचालक युसूफ मुसा चोरडवाला, इरफान देसाई, अजीज खान, इस्माईल चोरडवाला यांना चाव्या प्रदान करून बग्गी मार्गस्थ करण्यात आल्या.
250 बेरोजगारांना मिळणार रोजगार
उबो राईड्ज या कंपनीकडून बग्गी चालविण्यात येणार आहे. एकूण 40 व्हिक्टोरिया बग्गी टप्प्याटप्प्याने मुंबईत चालविण्यात येतील. पहिल्या टप्प्यात 12 दक्षिण मुंबईत सुरू करण्यात येणार आहेत. या 12 बग्गींपैकी 6 बग्गी ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील ताज पॅलेस हॉटेलसमोरून सुटतील, तर उरलेल्या 6 बग्गी नरीमन पॉइंट येथून सुटणार आहेत. या बग्गींमधून सायंकाळी 4 वाजल्यापासून मध्यरात्री 2 वाजेपर्यंत दक्षिण मुंबईची सफर करता येईल. घोडागाडय़ा बंद झाल्याने या व्यवसायातील सुमारे 250 बेरोजगारांना यात सामावून घेतले जाणार आहे. ही बग्गी पर्यावरणपूरक लिथियम बॅटरीवर चालणारी आहे. एकदा बॅटरी चार्ज झाल्यावर 70 ते 80 किमीपर्यंत प्रवास शक्य होणार आहे.
सेवेचा विस्तार होणार
मुंबईनंतर जुहू, बॅण्डस्टॅण्ड, ठाणे तलाव पाळी इत्यादी ठिकाणी या सेवेचा विस्तार तर मुंबईबाहेरील पर्यटन स्थळांवरही लवकरच सेवा सुरू केली जाणार असून मुंबईतील मोठय़ा रेस्टॉरंटसोबतही करार केला जाणार आहे. प्रतिव्यक्ती 100 रुपये शुल्क या सेवेसाठी घेतले जाण्याची शक्यता आहे.
मुंबईसह पुणे, कोल्हापूर येथील पर्यटन स्थळांवर सेवा मिळणे आवश्यक – आदित्य ठाकरे
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या उपक्रमाची माहिती घेत पाहणी केली. मुंबईव्यतिरिक्त राज्यातील पुणे, कोल्हापूर अशा पर्यटन स्थळांवरदेखील अशी सुविधा सुरू होणे गरजेचे असल्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईतील हेरिटेज स्थळे दाखवणे आणि प्रत्येक स्थळाजवळ संबंधित स्थळांची माहिती पर्यटकांना मिळण्याची सुविधा या गाडीत असेल.






























































