दहावी, बारावी परीक्षा वेळापत्रकानुसारच; अफवांवर विश्वास ठेवू नका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसला तरी दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेताना सुरक्षेचे उपाय म्हणून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना येत्या दोन दिवसांत जारी करण्यात येतील, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थी, पालकांनी परीक्षेसंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही शिक्षण मंडळाने केले आहे.

दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे तर तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा 12 ते 28 एप्रिलदरम्यान होणार आहे. तसेच बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे व तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा 4 ते 22 एप्रिलदरम्यान होणार आहे.

परीक्षेसंदर्भात महत्त्वाच्या सूचना शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर प्रसिद्धीस दिली जातील तसेच शाळांनाही सूचना दिल्या जातील. शिक्षण मंडळाकडून मिळणाऱया मार्गदर्शक सूचनांचे पालन करून विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षेस सामोरे जावे.