बिबट्याचा दिवसाच मेंढ्यांच्या कळपावर हल्ला, कवठे येमाईच्या ढगेमाथा येथील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या ढगे माथ्यानजिक शुक्रवारी दिवसाच दुपारी तीनच्या दरम्यान मेंढयांच्या काळपावर चाल करून गेलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी ठार झाल्याची घटना घडली आहे. आधीच कोरोनाचे संकट व त्यातच बिबट्याची दहशत सुरूच असल्याने शेतवस्तीवर राहणारे शेतकरी धास्तावले आहेत.घटनेबाबत शिरूर वनविभागास माहिती देताच वनकर्मचारी हनुमंत कारकूड यांनी घटनेची माहिती घेऊन तात्काळ पंचनामा केला आहे.

याबाबत शेतकरी तुकाराम हिलाळ (50) या मेंढपाळ शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दुपारी तीनच्या सुमारास ते येथील रोहिदास येडे यांच्या उसाच्या शेतानजीकच्या बांधाजवळ बकरे चारीत होते. तेव्हा बाजूकडील उसाच्या शेतातून आलेल्या भल्यामोठ्या बिबट्याने थेट मेंढ्यांच्या काळपावर हल्ला केला. या हल्ल्यात एक मेंढी ठार करीत तिला उसाच्या शेतात बिबट्या घेऊन गेला. पण तुकाराम हिलाळ व त्यांच्या सोबत असणारा दुसरा मेंढपाळ ननू रोहिले या 2 मेंढपाळ शेतकऱ्यांनी हातातील काठीसह बिबट्याच्या मागे धाव घेत उसाच्या शेतात जावून धाडसाने मेंढी बिबट्याच्या तावडीतून सोडविली. पण बिबट्याने मेंढीच्या गळ्यावरच चावा घेतल्याने रक्तबंबाळ झालेली मेंढी ठार झाली. त्यामुळे हिलाळ यांचे मोठेच नुकसान झाले.

या परिसरात बिबटे मोठ्या प्रमाणात असून पाळीव कुत्रे, जनावरे बिबट्यांच्या हल्ल्यात नाहक बळी पडत असल्याचे बारकू रोहिले, डॉ.रविंद्र कांदळकर, डॉ.संपत गावडे, छबुकाका रोहिले, चंद्रकांत रोहिले, रोहिदास येडे या शेतकऱ्यांनी सांगितले. परिसरात पाळीव प्राण्यांवर वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.

शिरूरच्या वनपाल चारुशीला काटे यांना घटनेची माहिती देताच वनकर्मचारी कारकूड यांनी या ठिकाणी तत्काळ भेट देत पंचनामा केला आहे. शासन नियमानुसार या शेतकऱ्यास वनविभागामार्फत योग्य ती नुकसान भरपाई मिळेल असे वनपाल काटे यांनी सांगितले. तर या ठिकाणी पिंजरा लावण्याची परीसरातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता तत्काळ पिंजरा लावण्याचे आश्वासन वनविभागाच्या वतीने देण्यात आले.