
माझं नाव नरेंद्र मोदी नाही; मी खोटं बोलत नाही. जे आश्वासन देईल ते पूर्ण करीन, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आसाम दौऱयात पंतप्रधान मोदींवर हल्ला चढविला. कोणताही धर्म द्वेष पसरवत नाही. मात्र, भाजप हा द्वेष पसरविणारा पक्ष आहे. नागपुरात जन्मलेली एक संघटना संपूर्ण देशाला आपल्या नियंत्रणात ठेवू पाहत आहे असेही टीकास्त्र त्यांनी सोडले.
विधानसभा निवडणुक प्रचारासाठी राहुल गांधी आसाम दौऱयावर आहेत. त्यांनी दिब्रुगड येथे प्रचारसभा घेतली. तसेच चहाच्या मळ्याला भेट दिली. चहा मळ्यातील मजुरांबरोबर जेवण घेतले. राहुल गांधी यांनी संघाचे नाव न घेता निशाणा साधला. तसेच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिकास्त्र सोडले. देशात लोकशाहीचे पतन होत आहे. बेरोजगारी वाढली आहे. शेतकरी आंदोलन करीत आहेत. नागपुरात जन्मलेली एक संघटना संपूर्ण देशावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपची निती तोडा आणि राज्य करा अशी आहे. मात्र तरूणांनी प्रेमाने आणि निश्चयाने याचा प्रतिकार केला पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.

























































