ड्रीम्स मॉल आगीचा स्थायी समितीत ‘भडका’! ‘सनराईज’ला यापुढे रुग्णालयासाठी परवानगी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अग्निशमन यंत्रणा नसल्याने नोटीस देऊनही ड्रीम्स मॉलमधील सनराईज हॉस्पिटल सुरू ठेवल्यामुळेच आगीची दुर्घटना घडल्याचा गंभीर आरोप करीत आज शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. 11 जणांचा नाहक बळी गेलेल्या या दुर्घटनेला जबाबदार असणाऱया सर्व अधिकाऱयांची सखोल चौकशी करून कारवाई करा, अशी जोरदार मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान, दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता यापुढे संबंधित मॉलमध्ये ‘सनराईज’ला रुग्णालय सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार नाही, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

भांडुप येथील ड्रीम्स मॉलला 26 मार्च रोजी लागलेल्या भीषण आगीत तिसऱया मजल्यावरील सनराईज हॉस्पिटलला सर्वात मोठा फटका बसला. या भीषण आगीतून अग्निशमन दलाने 67 कोरोना रुग्णांना वाचवले असले तरी व्हेंटिलेटरवर असणाऱया 11 कोरोना रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला. या दुर्घटनेचे तीव्र पडसाद स्थायी समितीत उमटले. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी यावेळी हरकतीचा मुद्दा मांडून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच दुर्घटना घडल्याचा आरोप केला. याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला. वरळीतील ऑट्रिया मॉलसारख्या ठिकाणी प्रचंड अनियमितता असताना पालिका प्रशासन जाणीवपूर्वक कारवाई करणे टाळत असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव म्हणाले. तसेच पुढील बैठकीत प्रशासनाने भांडुपच्या ड्रीम्स मॉलमधील आगीचा सविस्तर लेखी अहवाल सादर करावा असे निर्देशही अध्यक्ष जाधव यांनी दिले. यावेळी सभागृह नेत्या विशाखा राऊत, राष्ट्रवादीच्या राखी जाधव, ‘सपा’चे रईस शेख, भाजपचे प्रभाकर शिंदे आदींनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच आगीच्या घटना वाढल्याचा आरोप करीत दुर्घटनेची चौकशी करून जबाबदार अधिकाऱयांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

रुग्णालयाच्या परवानगीची वाढीव मुदतही संपली

कोरोना काळामुळे ड्रीम्स मॉलमधील सनराईज रुग्णालय कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. ही मुदत 28 फेब्रुवारी रोजी संपल्याने 31 मार्चपर्यंत वाढीव मुदतीची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे आज 31 मार्च रोजी ही मुदत संपली, मात्र दुर्दैवाने 26 मार्च रोजी दुर्घटना घडल्याने 11 जणांचा बळी गेल्याने सद्यस्थितीत मॉलसह हे रुग्णालय बंद आहे. त्यामुळे आगामी काळात या मॉलमध्ये रुग्णालय सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचे काकाणी यांनी सांगितले.

स्ट्रक्चरल, फायर ऑडिटसह इलेक्ट्रिक ऑडिटही करा

मुंबईतील 80 टक्के आगी शॉर्टसर्किटमुळेच लागल्याचे अलीकडच्या सर्वेक्षणामुळे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व रुग्णालयांच्या स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिटसोबतच इलेक्ट्रिक ऑडिटही करा, अशा सूचना सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी प्रशासनाला केल्या. अग्निशमन दलातील जवान-अधिकारी दुर्घटनेप्रसंगी जिवाची बाजी लावून काम करीत आहेत. मात्र अग्निशमन विभागातील काही अधिकाऱयांचे आपापसातील हेवेदावे वाढल्याचा परिणाम कार्यक्षमतेवर होत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.