
>> शिरीष कणेकर
तशी विषानं माखलेल्या डोळय़ांची कुलदीप कौर एक काळ गाजवून गेली. आजकाल हृदयी हलाहल बाळगणारी व कुंभापरी उरोज असलेली बिंदू नावाची पुतनामावशी पडद्यावर नायक-नायिकेच्या प्रेमाच्या मार्गात विषारी काटे कर्तव्यबुद्धीने पेरत असते. प्रमिला, सोफिया, मनोरमा यांनीही आपापल्या काळात आपापल्या परीनं दुष्टावा साधला. पण खलनायिका म्हटलं की प्रथम डोळय़ांपुढं उभी राहते ती शशिकला. प्रथम डोळय़ांना रांजणवाडीपेक्षाही जास्त खुपते ती शशिकला असं म्हणणं जास्त रास्त ठरेल. ती दुस्वास करते नायिकेचा, छळवाद मांडते नायकाचा आणि मेंदू कुरतडते प्रेक्षकांचा!
‘आरती’मध्ये शशिकलानं साकार केलेल्या, माघारी आलेल्या नणंदेच्या अशुभ, अपशकुनी अस्तित्वानं घराच्या भिंती ग्रासतात आणि आतल्या माणसांची मनं कोमेजून जातात. तिच्या अवलक्षणी जिभेचे आसुड सालस मीनाकुमारीच्या अंगावर पडतात तेव्हा वेळ मीनाच्या व्यथेशी एकरूप झालेल्या प्रेक्षकांच्या पाठीवर उठतात. ‘हमराही’त शेवटी शशिकलाचा खून होतो. तोवर तिची पापकर्मं इतकी वाढलेली असतात, प्रेक्षकांशी तिनं इतकं वैर साधलेलं असतं की, तिचा असा खतरनाक शेवट झालेला पाहताना वाईट वाटत नाही. मांजरानं उंदराच्या जिवाशी खेळ करावा, तद्वत् ती ‘गुमराह’मध्ये बोटात चावी फिरवत माला सिन्हाशी क्रूर खेळ करते तेव्हा प्रेक्षकांची सारी सहानुभूती नवऱयाशी बेईमानी करून जारकर्म करणाऱया मालाच्या पाठीशी उभी राहते. तिच्या पापाची धार बोथट व्हावी एवढं शशिकलाचं अस्तित्व सैतानी असतं. अभिनयसामर्थ्याचा याहून मोठा विजय तो काय असायचा!
छप्पनछुरी ‘ब्लॅकमेलर’ आणि पंचपतिक्रतातली एक म्हणून गणली जाणारी महासती सावित्री या दोन धृवांवरच्या भूमिका या सोलापूरच्या कन्येनं एकाच वेळी आणि सारख्याच ताकदीनं केल्या. ‘करदार’ला ‘गुमराह’ करायची आणि तिथून ‘राजकमल’ला ‘सत्यवान-सावित्री’ हा गुजराती चित्रपट करायची. ‘गुमराह’नं तिला खलनायिकोत्तमा ठरवलं आणि ‘सावित्री’ने तिला पारितोषिकं मिळवून दिली. सव्यसाचित्व म्हणतात ते याहून काय वेगळं असतं!
‘मै बनूंगी फिल्मीस्टार, सारी दुनिया करेगी मुझसे प्यार’ हे गाणं ‘अजीब लडकी’त तिच्या तोंडी होतं. पण ती सहजासहजी फिल्मी स्टार झाली नाही. आधी ‘बॉम्बे टॉकीज’, ‘रणजीत’, ‘मिनर्व्हा’, ‘प्रभात’ या गाजलेल्या कंपन्यातून ‘एक्स्ट्रा’ची उमेदवारी केल्यावर शौकत हुसेनच्या ‘झीनत’मध्ये प्रथम शशिकला प्रेक्षकांच्या डोळय़ांत भरली. ‘आहे ना भरे, शिकवे ना किये’ या अतिप्रसिद्ध कव्वालीत शशिकला श्यामा आणि शालिनी यांच्यासह चमकली. ‘डोली’, ‘पगडी’, ‘जलतरंग’ आदी चित्रपटांतून दुय्यम भूमिका केल्यावर ‘रणजित’च्या ‘नजारे’मध्ये ती प्रथम नायिका झाली. षोडशा होती ती तेव्हा. त्यानंतर केदार शर्माच्या ‘ठेस’मध्ये ती नायिका झाली. योगिता बालीचा बाप जसवंत तिचा नायक होता. ‘जुगनू’मध्ये दिलीपकुमार तिचा भाऊ होता. बालपणापासूनच ती ज्याची फॅन होती त्या अशोककुमारची ती ‘समाज’मध्ये नायिका झाली. परंतु रूप आणि अभिनयगुण असूनही नायिका म्हणून तिचं बस्तान बसू शकलं नाही. मग घर चालवण्यासाठी ती ‘अरब का सौदागर’ आणि ‘अबे हयात’ यांसारख्या मिळेल त्या सामान्य चित्रपटात कामं करत राहिली. ‘आरती’नं तिच्या चित्रपट जीवनाला विलक्षण कलाटणी दिली. नायिका म्हणून काय मिळाली असती अशी अफाट लोकप्रियता तिच्या पायांशी लोळण घेत आली. ‘मेहेरबान’, ‘नौ दो ग्यारह’, ‘पैसा या प्यार’ अशा किती तरी चित्रपटांत खत्रुड स्वभावाची स्त्र्ााr तिनं सादर केली आणि त्याचबरोबर ‘सुजाता’, ‘अनुपमा’मध्ये अल्लड तरुणीच्या भूमिका तिनं समर्थपणे पेलल्या. नाचाचं शिक्षण घेतलेलं नसतानाही ‘पटरानी’त वैजयंतीमालाच्या बरोबरीनं नाचली. ‘फूल और पत्थर’मधल्या कॅबेरेसाठी दहा-दहा तास नृत्यदिग्दर्शक सूर्यकुमार यांच्याकडं सराव केला. ‘करोडपती’ हा चित्रपट निर्माण करून शशिकलानं हात पोळून घेतले. ‘येरे माझ्या मागल्या’, ‘सलामी’, ‘लेक चालली सासरला’, ‘महानंदा’ अशा चार-दोन मराठी चित्रपटांत ती चमकली.
द्वितीय विवाहविच्छेदानंतर शशिकलानं चित्रपट संन्यास घेतला. ती चारीधाम फिरली. सत्संग केला. पाच वर्षं ती फिरत होती. गमावलेली मनःशांती पुन्हा प्राप्त केल्यावर शशिकला पडद्याकडं परतली. ‘हाजीर तो वजीर’ हा न्याय असलेल्या फिल्मी दुनियेनं तिचं दोन्ही बाहू पसरून स्वागत केलं. तिची लोकप्रियता वा तिला असलेली मागणी तसूभरही कमी झाली नाही.
सोनं पडून राहिल्यानं त्याला गंज चढत नसतो वा त्याची किंमत कमी होत नसते!






























































