कोरोनाविरोधात रस्त्यांवर धावणार चित्ररथ, पालिका-युनिसेफच्या सहकार्याने जनजागृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका कोरोना चाचण्या वाढवण्यावर आणि लसीकरणावर भर देत असताना कोरोनाविरोधात जनजागृती करण्यासाठी पालिका आणि युनिसेफच्या सहकार्याने मुंबईच्या रस्त्यांवर चित्ररथ धावू लागला आहे. महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी आज चित्ररथाचा शुभारंभ केला. दरम्यान, जनजागृतीसाठी आणखी दोन चित्ररथ बनवण्यात येणार आहेत.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लादण्यात आले असून दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक केले असून हातांची स्वच्छता, सुरक्षित अंतर राखणे तसेच थुंकण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर जनजागृतीवरही भर देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पालिका आणि युनिसेफच्या माध्यमातून चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे.

महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार तसेच उपआयुक्त देवीदास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य खात्याने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे अशा तीनही क्षेत्रांमध्ये प्रत्येक एक चित्ररथ फिरवून जनजागृती केली जाणार आहे.

चित्ररथामध्ये थ्रीडी मॉडेल साकारण्यात आले असून ध्वनिक्षेपण यंत्रणादेखील लावण्यात आली आहे.
चित्ररथावर प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वयंसेवकांमार्फत निरनिराळे जनजागृतीपर संदेश देण्यात येतील.
कोरोनाबद्दल माहिती देतानाच पत्रकांचे आणि मास्कचे वितरणही नागरिकांमध्ये करण्यात येणार आहे.
विभाग कार्यालयांमध्ये कार्यरत वॉर्ड वॉर रूमचे दूरध्वनी क्रमांकही चित्ररथावर प्रदर्शित करण्यात आले आहेत.
वेगवेगळ्या विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये संपूर्ण परिसरात फिरून जनजागृती करताना स्थानिक लोकप्रतिनिधींनाही त्यामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. त्याचबरोबर विभागीय समाज विकास अधिकारी यांचीही मदत घेतली जाणार आहे.