
सोनम मलिक आणि अंशू मलिक या हिंदुस्थानी महिला कुस्तीपटूंनी शनिवारी टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट बुक केले. या दोघांनी कझाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक देत अनुक्रमे 62 किलो व 57 किलो गटातून ऑलिम्पिकचा कोटा मिळवला, मात्र रियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला कास्यपदक जिंकून देणाऱया साक्षी मलिकचे ऑलिम्पिक पात्रतेचे स्वप्न भंगले.
कझाकिस्तानमधील अल्मटी शहरात सुरू असलेल्या या स्पर्धेत 18 वर्षीय सोनम मलिकने उपांत्य लढतीत यजमान देशाच्या अयाउल्म केसीमोवा हिचा 9-6 गुणफरकाने पराभव केला. सोनम एक वेळ 0-6 अशी पिछाडीवर होती, मात्र त्यानंतर तिने सलग 9 गुणांची कमाई करीत दिमाखात अंतिम फेरी गाठली. 19 वर्षीय अंशू मलिकने उपांत्य लढतीत उझबेकिस्तानच्या शोखिदा एक्खमिदोवा हिचा 12-2 असा दारुण पराभव करीत रुबाबात अंतिम फेरी गाठली.
साक्षीवर वर्चस्व
आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीपूर्वी झालेल्या ट्रायलमध्ये सोनमने साक्षी मलिकचा 8-7 गुणांनी पराभव केला होता. सोनमने मागील दोन वर्षांत साक्षीला चार वेळा धूळ चारलेली आहे. त्यामुळे सोनमने ऑलिम्पिक पात्रता सिद्ध करताच साक्षीच्या ऑलिम्पिक पात्रतेच्या आशांना सुरुंग लागला आहे.
कुस्तीत हिंदुस्थानच्या सहाजणांना कोटा
अंशू आणि सोनम मलिक यांच्याआधी हिंदुस्थानच्या चार कुस्तीपटूंनी टोकियो ऑलिम्पिकचा कोटा मिळवलेला आहे. महिलांच्या 53 किलो गटात विनेश पह्गाटने ऑलिम्पिकचा कोटा मिळवलेला आहे. पुरुष गटात रवि कुमार दहिया, बजरंग पुनिया व दीपक पुनिया यांनीही टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट बुक केलेले आहे. अंशू मलिक आणि सोनम मलिक यांच्या रूपाने आता टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या हिंदुस्थानी कुस्तीपटूंची संख्या 6 झाली आहे.




























































