
विवाहानंतर कतारचे मोफत हनिमून पॅकेज घेण्याच्या मोहाने नकळत 4 किलो हशिश हा प्रतिबंधित अमली पदार्थ सोबत नेणाऱया मुंबईतील ओनिबा कुरेशी आणि शरीक कुरेशी या नवदांपत्याची अखेर नर्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)च्या सहकार्याने अखेर निर्दोष मुक्तता झाली आहे. कतार सरकारने 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झालेले हे दांपत्य अखेर 2 वर्षांनी तुरुंगातच जन्मलेल्या आपल्या चिमुकलीसह गुरुवारी मुंबईत परतले आहे. विशेष म्हणजे त्यांना फसवणारी शरीक यांची काकूच होती. तिनेच भाचा शरीक आणि सून ओनिबा यांना ‘बळीचा बकरा’ बनवल्याचे उघड झाले आहे.
जुलै 2019 मध्ये कतारमधील हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर कुरेशी दांपत्याच्या बॅगमध्ये 4.1 किलो चरस सापडल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. कतारच्या कायद्यानुसार त्यांना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष म्हणजे नंतर शरीक यांच्या काकू तबस्सुम रियाज कुरेशी यांनीच ड्रग्ज तस्करीसाठी दांपत्याची फसवणूक केल्याचे समोर आले. शिवाय ओनिबा आणि शरीक यांच्या ट्रीपचे आयोजनही तबस्सुम यांनीच केल्याचा खुलासा नंतर झाला. त्यानंतर शरीक यांच्या कुटुंबीयांनी आपल्या निर्दोष मुलाला सोडवण्यासाठी हिंदुस्थान सरकारला साकडे घातले होते.
नार्कोटिक्स ब्युरो ठरला कुरेशी दांपत्यासाठी देवदूत
हिंदुस्थानच्या राष्ट्रीय नार्कोटिक्स ब्युरो (एनसीबी)ने कतार प्रशासनाला नवविवाहित कुरेशी दांपत्याची फसवणूक झाल्याचे पटवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यानंतर दांपत्याच्या नातलगांनी कोर्टात शिक्षेविरोधात अपील केले. दरम्यानच्या काळात गेल्या फेब्रुवारीमध्ये गर्भवती असलेल्या ओनिबाने कारागृहातच बाळाला जन्म दिला. अखेर 3 फेब्रुवारीला कतारच्या कोर्टाने या दांपत्याची निर्दोष सुटका केली. ड्रग्ज प्रकरणात ‘बळीचा बकरा’ ठरलेले हे दांपत्य आता तुरुंगातच जन्मलेल्या आपल्या मुलीसह मायदेशी मुंबईत परतले आहे. आखाती देशात मोठय़ा संकटात सापडलेल्या कुरेशी कुटुंबासाठी एनसीबी आणि एनसीबीचे अधिकारी देवदूतच ठरले आहेत.



























































