नगरमध्ये बिले तपासणीसाठी 26 पथके, मनपा आयुक्तांकडून 32 अधिकाऱयांची नियुक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शासनाने निश्चित करून दिलेल्या दरापेक्षा वाढीव बिलांची आकारणी होत असल्यामुळे महापालिका आयुक्तांनी बिलांच्या तपासणीसाठी 32 अधिकाऱयांचा समावेश असलेल्या 26 पथकांची नियुक्ती केली आहे. तसेच, रुग्णालयातील उपलब्ध बेडची माहिती व रेमडेसिविरच्या वापरलेल्या व्हायल ताब्यात घेण्याची जबाबदारीही या पथकावर सोपविण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी बिले तपासणीसाठी 32 अधिकाऱयांची नियुक्ती केली असून, त्यांना 26 रुग्णालये विभागून देण्यात आली आहेत. शासनाच्या निर्देशानुसार बिलांची पूर्ण तपासणी करणे, रुग्णालयातील बेडच्या उपलब्धतेची माहिती घेऊन दैनंदिन अहवाल सादर करणे, तसेच रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरलेल्या रिकाम्या व्हायल रुग्णनिहाय ताब्यात घेणे आदी जबाबदाऱया या 31 अधिकाऱयांवर सोपविण्यात आल्या आहेत.

संबंधित अधिकाऱयांना तत्काळ नेमून दिलेल्या रुग्णालयात रुजू होण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. इंजेक्शनच्या रिकाम्या व्हायल ताब्यात घेऊन त्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याकडे सादर करावी. तसेच बेडच्या उपलब्धतेबाबत सहायक आयुक्त सचिन राऊत यांच्याकडे दैनंदिन अहवाल सादर करावा. तसेच, बिलांची तपासणी करून त्याचा अहवाल मनपाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण मानकर यांच्याकडे सादर करावा, असे आदेश मनपा आयुक्त गोरे यांनी दिले आहेत.

केलेल्या नियुक्त्या कोणत्याही परिस्थितीत रद्द करण्यासाठी प्रस्ताव सादर करू नयेत, अशी तंबीही आयुक्त शंकर गोरे यांनी दिली आहे.