कोरोनाविरुद्धचा लढा कमकुवत करू नका! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मी जनतेच्या, लोकप्रतिनिधींच्या संपर्कात राहणारा कार्यकर्ता आहे. वृत्त वाहिन्यांच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱया, खोटय़ा प्रसिद्धीसाठी धडपडणाऱया नेत्यांपैकी मी नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्याला कमकुवत करण्याचे पाप करु नका, असे खडे बोल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सुनावले.

दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी अलिकडे माझ्यावर दररोज बिनबुडाचे आरोप करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर आरोप करण्यापूर्वी, त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी मला भेटले होते. किती मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधींशी मी संपर्क साधून चर्चा केली, याची माहिती घेतली असती, तर असे खोटे आरोप करण्याची त्यांची हिंमत झाली नसती, असा टोलाही पवार यांनी लगावला.

अजित पवार जनतेच्या संपर्कात नसतात, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या टीकेला अजित पवार यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. टिव्हीच्या पडद्यावर चमकण्यासाठी हापापलेल्या विरोधी पक्षनेत्यांनी, बिनबुडाचे आरोप करुन राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण करु नये, असेही पवार यांनी बजावले. मंत्रालयात आणि राज्यातील जनतेत मी कायम उपस्थित असताना ‘अजित पवार नेटवर्कबाहेर’चा आरोप करणाऱयांचा हेतू आणि मेंदू तपासून घेण्याची गरज आहे, असेही अजित पवार म्हणाले.