18 ते 45 वर्षांच्या लोकांना लसीसाठी ‘कोविड’ नोंदणी करावी लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात 1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांसाठी कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळण्याची शक्यता आहे. ही गर्दी टाळण्यासाठी सरकारने 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांना ‘कोविन’ पोर्टलवर नोंदणी करून अपॉइंटमेंट घेणे बंधनकारक केले आहे. 45 वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची मुभा कायम राहील.

देशातील कोरोनाचा भयानक संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांना 1 मेपासून लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांसाठी लसीकरण सुरू झाल्यानंतर लसीची मागणी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे संभाव्य गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने 18 ते 45 वर्षे वयोगटातील नागरिकांना कोविन पोर्टलवर नोंदणी करून अपॉइंटमेंट घेणे बंधनकारक केले आहे. लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी उसळू नये म्हणून सुरुवातीला ऑनसाइट रजिस्ट्रेशनला मुभा नसेल, असे केंद्र सरकारमधील अधिकृत सूत्रांनी सांगितले.

28 एप्रिलपासून नोंदणी करता येणार

45 वर्षांपर्यंतच्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी 28 एप्रिलपासून कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपवर नोेंदणी करता येईल. लसीकरण प्रक्रिया आणि लसीसाठी सादर करावयाची कागदपत्रे तीच राहतील. सध्या खासगी रुग्णालये केंद्र सरकारकडून लसीचे डोस घेऊन नागरिकांना एक डोस 250 रुपयांना देत आहेत. 1 मेपासून खासगी रुग्णालयांना थेट लस उत्पादक कंपनीकडून डोस खरेदी करावे लागणार आहेत.