हिंदुस्थानला तीन सुवर्ण, एक कांस्य; तिरंदाजी वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्तम कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या तिरंदाजांनी ग्वाटेमाला सिटीमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्टेज-1 स्पर्धेत कारकीर्दीतील सर्वेत्तम कामगिरी करताना तीन सुवर्ण व एका कांस्यपदकाची कमाई केली. दीपिका कुमारी, अंकिता भाकत व कोमलीका बारी या त्रिकुटाने रिकर्व्ह प्रकारात हिंदुस्थानला सुवर्णपदक जिंकून दिले. दीपिका कुमारी व तिचा पती अतानू दास यांनी वैयक्तिक सुवर्णपदके पटकावली, तर अतानूने अंकिता भाकतच्या साथीने देशाला मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकून दिले.

हिंदुस्थानच्या दीपिका कुमारी, अंकिता भाकत व कोमलीका बारी या महिला तिरंदाज संघाने स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. हिंदुस्थान व मेक्सिको यांच्यातील अंतिम फेरीत एक-एक गुणासाठी पाठशिवणीचा खेळ बघायला मिळाला. शेवटी 4-4 अशा बरोबरीमुळे ही लढत शूट ऑफमध्ये गेली. हिंदुस्थानी त्रिकुटाने अखेरच्या क्षणी 27-26 अशी बाजी मारून सुवर्णपदकावर नाव कोरले.

दीपिकाने शूट-ऑफ फेरीत 10 गुण मिळवत 2012च्या लंडन ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या आयडा रोमन हिच्यावर दबाव आणला. अखेर आयडाला नऊ गुणांची आवश्यकता असताना फक्त आठ गुण मिळवता आले. हिंदुस्थानचे या स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारातील हे पाचवे सुवर्णपदक होय. याआधी, 2011 (शांघाय), 2013 (मेडेलिन), 2013 व 2014 (व्रोक्लों) असे चार वेळा हिंदुस्थानने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. हिंदुस्थानच्या महिला रिकर्व्ह संघाने तब्बल सात वर्षांनंतर हे सोनेरी यश संपादन केले आहे. दीपिकाचे हे विश्वचषक स्पर्धेतील पाचवे सांघिक सुवर्णपदक ठरले.

ऑलिम्पिक पात्रतासाठी मनोबल उंचावले

हिंदुस्थानच्या महिला तिरंदाजी संघाने अद्यापि ऑलिम्पिकचा कोटा मिळविलेला नाही. मात्र, जूनमध्ये पॅरिस येथे होणाऱया वर्ल्ड कप स्टेज-3 या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी नक्कीच हिंदुस्थानी महिला तिरंदाजांचे मनोबल उंचावले आहे. हिंदुस्थानी महिलांनी उपांत्य फेरीत स्पेनचा पराभव केला होता, तर उपांत्यपूर्व फेरीत यजमान ग्वाटेमाला सिटी संघाला हरविले होते.

दीपिका, अतानूला सुवर्ण

माजी ‘नंबर वन’ खेळाडू असलेल्या दीपिका कुमारीने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना अमेरिकेच्या आठव्या मानांकित मॅपेंजी ब्राउनचा 6-5 असा पराभव करून सुवर्णवेध साधला. दीपिकाचे या स्पर्धेतील हे तिसरे सुवर्णपदक होय. अतानू दासने स्पेनच्या डॅनियल कास्त्रोचा 6-4 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.

अतानू-अंकिता जोडीला कांस्य

अतानू दास व अंकिता भाकत या जोडीने हिंदुस्थानला मिश्र दुहेरीत कांस्यपदक मिळवून दिले. कांस्यपदकाच्या लढतीत अमेरिकन जोडीविरुद्ध 0-2 ने पिछाडीवर पडल्यानंतर हिंदुस्थानी जोडीने दुसऱया व तिसऱया सेटमध्ये शांतपणे खेळ करीत 6-2 फरकाने बाजी मारली. अंकिताने दुसऱया सेटमध्ये दोन वेळा 10 गुणांची कमाई केली, तर अतानूने तिसऱया सेटमध्ये दोनदा 10 गुळ मिळवून अमेरिकन जोडीला हरविले.