
नगर जिल्ह्यातील रुग्णांसाठी लागणाऱया ऑक्सिजनची गरज आणि उपलब्धता यासंदर्भात नियोजन करण्यासाठी अधिकाऱयांचा समावेश असलेल्या सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पथकातील अधिकारी ऑक्सिजन प्लाण्टवर थांबून नियोजन करतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी नोडल अधिकारी व रिफिलर प्लाण्टधारकांची संयुक्त बैठक घेऊन त्यासंदर्भात सूचना केल्या आहेत.
नगर जिह्यातील ‘अहमदनगर इंडस्ट्रियस’ या गॅस प्लाण्टसाठी रिपार्ंटग ऑफिसर म्हणून उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, तर इन्चार्ज ऑफिसर म्हणून सहायक पुरवठा अधिकारी किशोर कदम आणि नायब तहसीलदार (नेवासा) डी. एम. भावले यांची नियुक्ती केली आहे. हायटेक एअर प्रोडक्ट्स (एमआयडीसी) येथील प्लाण्टवर रिपार्ंटग ऑफिसर म्हणून उपजिल्हाधिकारी उज्ज्वला गाडेकर आणि इन्चार्ज ऑफिसर म्हणून तहसीलदार वारुळे व नायब तहसीलदार राजू दिवाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अखत्यारीत तीन पथके कार्यरत असतील.
ऑक्सिजन रिफिलर यांना ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या ऑक्सिजनच्या दैनंदिन नोंदी घेणे, प्राप्त ऑक्सिजन पूर्णपणे वैद्यकीय कारणाकरिता वितरित होत असल्याची खातरजमा करणे, ऑक्सिजन रिफिलर यांच्याकडून गैरवैद्यकीय कारणाकरिता ऑक्सिजनपुरवठा होत असल्यास आवश्यक ती कारवाई करणे, ऑक्सिजन रिफिलर यांच्याकडून वितरण झालेल्या हॉस्पिटलच्या नोंदी ठेवणे, तसेच उपलब्ध करून देण्यात आलेली ऑक्सिजनची मात्रा याबाबतही नोंदी ठेवणे, रिफिलिंग प्लाण्टवरून निघालेला ऑक्सिजन वितरण करावयाच्या हॉस्पिटलला पूर्ण क्षमतेने प्राप्त झाल्याबद्दल खात्री करणे आदी कामे या पथकांकडे सोपविण्यात आली आहेत.
ऑक्सिजन प्लाण्ट परिसरात पोलीस बंदोबस्त
n ऑक्सिजन प्लाण्ट परिसरात सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने यापूर्वीच प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने अनेकजण ऑक्सिजन प्लाण्टच्या परिसरात गर्दी करतात. त्यामुळे वाद-विवादाचे प्रसंग निर्माण होऊन सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन संबंधित प्लाण्टच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
































































