
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेचा निकाल आता लागला आहे; पण सरकार गरीब मराठा विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी कुठलीच कसर बाकी सोडणार नाही. त्यामुळे या निकालासंदर्भात फेरयाचिका न्यायालयात दाखल करणार आहे, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे माध्यमांशी बोलताना दिली आहे. खरीप हंगाम आढावा बैठकीदरम्यान पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कृषीमंत्री दादा भुसेही उपस्थित होते.
फेरविचार याचिका दाखल करण्यासाठी एका निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून यासंदर्भात अहवाल मागवण्यात आला आहे. येत्या 15 दिवसांत त्यांचा अहवाल येणार असून त्यानंतर याचिका दाखल करण्यासंदसर्भात पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
सर्व रिक्त जागा भरणार
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी, ओपन, एससी आणि एसटी प्रवर्गातील सर्व रिक्त जागा आणि परीक्षा झालेल्या जागा भरण्यासाठी कोरोना संपल्यानंतर आढावा घेतला जाणार आहे. मुख्य सचिवांच्या समीक्षा अहवालानंतर नियुक्तीसंदर्भातील पुढील आदेश काढले जातील, अशीही माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.



























































