3 महिने बेपत्ता असलेले आमदार चव्हाण प्रकटले, म्हणे लस द्या नाही तर आंदोलन करू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविडविरोधात केलेल्या कामाबद्दल एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सरकारची स्तुती केली असून दुसरीकडे नितीन गडकरी यांनीही भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांना कोविड परिस्थितीत राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे.मात्र तरीही काही भाजप लोकप्रतिनिधी त्यातून अजून बोध घेताना दिसत नाहीत. डोंबिवली मतदारसंघाचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्याबाबतही नेमकी हीच स्थिती निर्माण झाली आहे. आमदार रवींद्र चव्हाण यांना तब्बल तीन महिन्यांनंतर कोविड लस आणि मतदार संघातील नागरिकांची आठवण झाली आहे.कोरोना प्रतिबंधक लसी पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याचा आव आणत आंदोलनाला इशारा दिला आहे.आधी केंद्र सरकारला आवश्यक प्रमाणात लसींचा पुरवठा करायला सांगा मग आंदोलन करा,असे म्हणत डोंबिवलीकरांनी त्यांच्या इशाऱ्याची खिल्ली उडवली आहे.

कोरोना नियंत्रणासाठी राज्य शासन,केडीएमसी प्रशासनाकडून दिवसरात्र काम करत आहे.केंद्र सरकारकडून पुरेशा लसी मिळत नसल्याने महापालिका प्रशासनाला दररोज शेकडो लोकांना उत्तरे द्यावी लागत आहेत.अशा परिस्थितीत गेले तीन महिने गायब असलेले रवींद्र चव्हाण मात्र राज्य सरकार,पालिका कारभारावर विनाकारण टीका करत आहेत.नागरिकांना वेळेवर लसी मिळत नाहीत,ऑक्सीजन बेड मिळत नाहीत,अशी टीका करत चव्हाण यांनी आंदोलनाचा इशारा दिला.मात्र त्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची खिल्ली उडवली जात आहे.एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी,नीती आयोग,न्यायालय,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कोरोना नियंत्रणाबाबत राज्य शासन करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत आहेत.रवींद्र चव्हाण मात्र केवळ प्रसिध्दीसाठी आंदोलनाची भाषा करत असल्याने डोंबीवलीकर संताप व्यक्त करत आहेत.

…तर घरी बसाल

सुजान डोबिंवलीकरांना आंदोलन नको तर त्यांना लसी हव्या आहेत.केंद्रावर दबाव टाकून त्या मिळवून द्या ,मग येथील नागरिक तुमच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होतील.नाहीतर तुम्हालादेखील येत्या निवडणुकीत योग्य पध्दतीने नकाराची लस पाजून डोंबिवलीकर घरी बसवतील,असा इशारा रवींद्र चव्हाण यांना माजी परिवहन समिती सभापती राजेश कदम यांनी दिला.