
कोरोनाची लागण झाल्याने शरीरातील प्राणवायू कमी होऊ लागला. एचआरसीटी स्कोर 23 च्या खाली आल्याने रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड मिळत नव्हता अशा कठीण प्रसंगात खचून न जाता सकारात्मकतेच्या जोरावर नागपूर येथील 47 वर्षीय गुरुदेव चकोले यांनी कोरोनावर मात केली.
नागपूर जिह्यातील टेकाटी कांद्री येथील रहिवासी गुरुदेव चाकले यांनी 3 एप्रिल रोजी लसीकरण करून घेतले. त्यानंतर त्यांना ताप येऊ लागला, पण ताप कमी होत नसल्याने कोविड चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आरोग्य केंद्रातून दिलेल्या औषधांवर पाच दिवस घरीच काढले. त्यानंतर शरीरातील प्राणवायू कमी होऊ लागल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी धावाधाव सुरू केली. एचआरसीटी स्कोर 23 गेल्याने डॉक्टरही उपचाराला नकार देत होते.
या कठीण प्रसंगात घाबरून जाता कांद्री येथील जवाहरलाल नेहरू रुग्णालयात उपचारासाठी ते दाखल झाले. मनावर कोणतेही दडपण न ठेवता जिद्द आणि सकारात्मक विचारांच्या बळावर उपचाराला प्रतिसाद दिला. कुठलेही व्हेंटिलेटर न लावता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेत स्वत:ची काळजी घेतल्यास कोरोनासारख्या गंभीर आजारावर सहज विजय मिळवू शकतो हे त्यांनी दाखवून दिले.



























































