
पाऊस आणि लॉकडाऊन यांच्यामुळे उत्तर प्रदेशात प्रदूषण कमी झालंय. प्रदूषण कमी झाल्याने हवामान स्वच्छ झालेय. त्यामुळे उत्तर प्रदेशाच्या पश्चिमेला असेलल्या सहारनपूर जिह्यातून थेट हिमालयाच्या शिखराचे दर्शन घडत आहे. सहारनपूरच्या लोकांनी घरांच्या गच्चीवर जाऊन हे सुंदर दृश्य टिपले आहे.
सहारनपूरचे रहिवाशी डॉक्टर विवेक बॅनर्जी यांनी हिमालयाचे फोटो शेअर करत म्हटलंय, ‘‘हे खूप अद्भुत दृश्य आहे. दोन दिवसांच्या पावसाने वातावरण स्वच्छ झालंय. म्हणून हिमालय दिसतोय. साधारण 30-40 वर्षांपूर्वी हिमालयाचे शिखर आम्ही रोज इथून बघायचो. मात्र प्रदूषणामुळे हे दृश्य दुर्मीळ झाले होते.’’
घरात बसून इतक्या लांबचे हिमालयाचे शिखर बघून आयकर अधिकारी दृष्यंत सिंह थक्क झाले. हिमालयातील गंगोत्री, यमुनोत्री आणि शिवलिक पर्वतरांगा यांच्या प्रदूषणात घट झाल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे दृष्यंत सिंह यांनी म्हटले. हिमालयाचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. नेटकरीही फोटो पाहून आश्चर्यचकीत झाले असून प्रदूषणावर चर्चा करत आहेत.





















































