
जगातील सर्वात सुरक्षित आणि जलद रेल्वे प्रवासासाठी जपान प्रसिद्ध आहे. वेळेचे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन याबाबत जपानचे नाव घेतले जाते. अशा या देशात नुकतीच एक आश्चर्यकारक घटना घडली. जपानमध्ये बुलेट ट्रेनचा ड्रायव्हर ट्रेन धावत असताना तिची जबाबदारी पंडक्टरवर सोपवून टॉयलेटमध्ये गेला. तीन मिनिटांसाठी ट्रेन सोडून गेलेल्या या ड्रायव्हरवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
सेंट्रल जपान रेल्वे कंपनीने ही घटना 16 मे रोजी घडल्याचे सांगितले. ताशी 150 कि.मी. वेगाने धावणाऱया ‘हिकारी-633’ या ट्रेनमध्ये 160 प्रवाशी होते. ट्रेनचा ड्रायव्हर केबिनमधून बाहेर पडून टॉयलेटमध्ये गेला. त्याने कंडक्टरला केबिनमध्ये लक्ष ठेवायला सांगितले होते. बराच वेळ लघुशंकेला न गेल्याने पोटात कळ आली, त्यामुळेच केबिन सोडले, असे सांगत ड्रायव्हरने माफी मागितली आहे.
ड्रायव्हरच्या कृत्यामुळे ट्रेनच्या प्रवासावर कोणताही परिणाम झाला नसला तरी नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी ड्रायव्हर आणि कंडक्टरवर कारवाई होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
जपानच्या नियमानुसार बुलेट ट्रेनच्या ड्रायव्हरला काही कारणाने केबिन सोडून बाहेर जायचे असेल तर तो कंडक्टरवर जबाबदारी सोपवू शकतो. पण कंडक्टरकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे किंवा ड्रायव्हरने केबिन सोडण्यापूर्वी ट्रान्स्पोर्ट कमांड सेंटरला कळवणे अत्यावश्यक असते. मात्र 36 वर्षीय ड्रायव्हरने कोणालाही न कळता परवाना नसलेल्या कंडक्टरकडे ट्रेनची जबाबदरी सोपवली. त्यामुळे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.

























































