‘कळंबा’च्या कोरोना सेंटरमधून पळालेले दोन कैदी जेरबंद, हातकणंगले-इचलकरंजी रोडवरील शेतातून घेतले ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या आयटीआय वसतिगृहातील कोरोना सेंटरमधून आठवडाभरापूर्वी पळून गेलेल्या दोघा कैद्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली.

प्रतीक सुहास सरनाईक (वय 30, रा. साई कॉलनी, पाचगाव रोड) आणि गुंडाजी तानाजी नंदीवाले (वय 28, रा. तमदलगे, ता. शिरोळ, दोघे जि. कोल्हापूर) अशी या कैद्यांची नावे आहेत.

प्रतीक सरनाईक याला एका खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक झाल्यानंतर 2018पासून, तर जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गुंडाजी नंदीवाले हा 2019पासून कळंबा कारागृहात न्यायाधीन बंदी आहे. कोरोनाची बाधा झाल्याने या दोघांना कारागृह प्रशासनाने कारागृहाच्या आयटीआय वसतिगृहाजवळील कोरोना सेंटरमध्ये दाखल केले होते. 14 मेच्या मध्यरात्री या दोघांनी कोरोना सेंटरमधील खिडकीचे गज काढून पलायन केले होते.

या दोघांच्या तपासासाठी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तीन पथके तयार केली होती. हे दोघेही शेंडा पार्क, पाचगाव, कळंबा, कापशी, भूदरगड, मुरगूड गडहिंग्लज व कागल परिसरात पायी चालत गेल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. त्यानंतर हे दोघे हातकणंगले परिसरात असल्याची पक्की खबर पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने सोमवारी रात्रीपासून या परिसरात शोध सुरू केला होता. हे दोघे हातकणंगले-इचलकरंजी रस्त्यावरील एका परमिट रूमच्या मागील बाजूस असलेल्या शेतात लपून बसल्याचे आढळले असून, या दोघांना अटक करण्यात आली आहे.

दोघेही होते कोरोना पॉझिटिव्ह

कोविड सेंटरमधून पळून गेलेले प्रतीक सरनाईक व गुंडाजी नंदीवाले हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यांना पकडताना पोलिसांनी त्यांच्यापासून प्रादुर्भाव होऊ नये याबाबतची विशेष दक्षता घेतली. या दोघांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले.