ना कलेचे शिक्षण, ना कुणाचे मार्गदर्शन, परभणीच्या चित्रकाराची सातासमुद्रापार भरारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चित्रकलेचे कोणतेही शिक्षण नाही, कुणाचे मार्गदर्शन नाही. शालेय शिक्षणही जेमतेम दहावीपर्यंतच झालेय. तरीही परभणीचे चित्रकार शिवराज जगताप यांनी आपल्या जादुई कलेने भल्याभल्यांना भुरळ घातलीय. त्यांच्या चित्रांना जगभरातून मागणी येतेय. एवढंच नव्हे तर सध्या लॉकडाऊनमध्ये आपल्या घरातून ते दुबई, कतार, सौदी अरेबिया आदी देशांतील मुलांना चित्रकलेचे ऑनलाईन धडे देत आहेत. संकटातही चांगली संधी शोधता येते, हे शिवराज जगताप यांनी दाखवून दिलेय.

लहान वयात शिवराज जगताप यांच्यात कलेची आवड निर्माण झाली. त्यांचे वडील बँकेत शिपाई होते. वडील कामावरून आल्यावर स्केचेस काढायचे. चौथ्या इयत्तेत शिकणारा शिवराज ते बघायचा. तिथूनच कलेची साथ जडली. जगताप यांनी चित्रकलेचे कोणतेही शिक्षण घेतले नाही. दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर पेंटिंगच्या माध्यमातून काही पैसे मिळतील का, हाच त्यांचा उद्देश होता. त्या परिस्थितीत पैसे मिळणे त्यांना महत्त्वाचे वाटायचे. त्यांनी पेंटिंगची कामे घ्यायला सुरुवात केली. हळूहळू त्यांचा चित्रकलेत जम बसला. वॉटलकलर हे त्यांचे आवडते माध्यम. या माध्यमात त्यांनी अनेक पोर्टेट काढली. पुढे फेसबुकवर चित्रांचे लाइव्ह करायला सुरुवात केली. त्यांच्या पेंटिंगची आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड झालेली आहे. त्याविषयी जगताप सांगतात, प्रदर्शनासाठी त्यांनी माझ्या काही पेंटिंग मागवल्या होत्या. त्यातून ते पेंटिंगची निवड करणार होते. माझे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पेंटिंग त्यांनी निवडले. याबद्दल जेव्हा त्यांचा ई-मेल आला तेव्हा खूप आनंद वाटला.

‘मास्टर्स’ व्हायला शिका!

कुणाचे मार्गदर्शन नसल्याने चित्र काढून त्यात काय चूक झाली आहे, ती चूक परत पुढच्या चित्रात होऊ नये, याची काळजी मी घेत होतो. अशा पद्धतीने चित्राचा सराव केला. यातून शिकत गेलो. आज तरुणांना खूप वाव आहे. चित्रकलेच्या अनेक शाखा वाढल्यात. त्यांना मार्गदर्शन करणारेही खूप आहेत, असे शिवराज जगताप यांनी सांगितले. कलेच्या क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱया मुलांना मार्गदर्शन करताना जगताप सांगतात, मुलांनो, तुम्हाला जे आवडतंय ते क्षेत्र निवडा. छंदातून उपजीविका होईल की नाही, याचा विचार करू नका. त्यात पुढे जा. या क्षेत्रातील ‘मास्टर्स’ व्हायला शिका.

  • जगताप यांची चित्रे ग्रीस, पोलंड, फ्रान्स, तुर्की, दुबई, पॅलिफोर्निया, चीन येथील चित्रप्रदर्शनात झळकली आहेत. चीनच्या जगप्रसिद्ध झियान म्युझियममध्ये त्यांच्या तीन चित्रांचा समावेश आहे. ते आंतरराष्ट्रीय वॉटर कलर सोसायटीचे सदस्य आहेत.