
“आपल्या सभोवताली नकारात्मक वातावरण असले तरी प्रत्येकाच्या मनात चैत्र फुलत असतो. हा काळ स्वतःशीच लढण्याचा आहे. नाती-गोती विखुरली आहेत. माणूसपण हरवत चालले आहे. मात्र जगण्याच्या उर्मीने, इर्षेने वेगवगळ्या पातळीवर माणूस लढतोच आहे. अशा पार्श्वभूमीवर चैत्रेय अंकाचे प्रकाशन होणे ही एक आनंदायी घटना आहे ” ज्येष्ठ कवी, गीतकार अरुण म्हात्रे यांचे हस्ते ‘चैत्रेय’ या विसाव्या अंकाचे प्रकाशन घरगुती वातावरणात संपन्न झाले. त्यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 28 मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीला हा अंक प्रकाशित झाला. छोटेखानी कार्यक्रमास ज्येष्ठ कवी, लेखक अरविंद दोडे, कवी-चित्रकार रामदास खरे, अंकाचे संपादक प्रा. डॉ नरेंद्र पाठक, कार्यकारी संपादक दया पाठक आणि तरुण कवी, संपादक मित्र गीतेश गजानन शिंदे, सिन्नरकर उपस्थित होते. ‘ते दिवस आता कुठे’ या लोकप्रिय कवितेने म्हात्रे सरांनी आपल्या भाषणाची सांगता केली.
“दिवाळी अंकांच्या भाऊगर्दीत न सामील होता स्वतंत्रपणे चैत्र महिन्यात चैत्रेय अंकाचे प्रकाशन करणे ही मोठी गोष्ट आहे. अनंत अडचणींचा सामना करून पाठक दांपत्यांनी हा अंक प्रकाशित केला आहे याचे कौतुक वाटते.विसावा अंक प्रकाशित झाला तरी यापुढे विसावा न घेता पुढचे अंक देखील जरूर काढावेत ही शुभेच्छा देतो. “वसंत ऋतू संदर्भातले अनेक प्राचीन दाखले, संदर्भ देऊन अरविंद दोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
रामदास खरे यांनी चैत्रेय अंकात विविध साहित्यिकांनी केलेल्या लिखाणाचा थोडक्यात धांडोळा घेतला आणि प्रभाकर साळगावकर यांच्या व्यंगचित्रे या कवितेचे वाचन केले. कवी, संपादक गीतेश शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.” अंकाचे स्वरूप लोभसवाणे असले तरी त्यामागची प्रचंड मेहनत, जिद्द आणि आवड ही विसरून चालणार नसते. पाठक सरांनी सर्व संकटांवर मात करून जिद्दीने हा दर्जेदार अंक प्रकाशित केला आहे. 111 वर्षाची परंपरा लाभलेल्या दिवाळी अंकांच्या वाचनानंतर आता काय वाचायचे तर ‘चैत्रेय’ सारखा अंक हा उत्तम पर्याय आहे. जुन्या-नव्या लेखक-कवींच्या साहित्याने नटलेला हा अंक संग्राह्य झाला आहे. हा विसावा अंक. या निमित्ताने गेल्या वीस वर्षातल्या अंकातील काही निवडक साहित्याचे एक पुस्तक निघावे असे पाठक सरांना सुचवावेसे वाटते.


























































