
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. मात्र ही कोणत्याही राजकीय स्वरूपाची भेट नव्हती असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
‘माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सोमवारी त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली’, असे फडणवीस यांनी ट्विट करीत या भेटीची माहिती दिली.
शरद पवार यांच्यावर गेल्या काही दिवसांत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. या विश्रांतीनंतर पवार गेल्या आठवडय़ापासून दैनंदिन कामात सक्रिय झाले आहेत. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली होती. आता फडणवीस यांनीही पवारांची भेट घेतली आहे. सुमारे वीस मिनिटे या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली.
या भेटीनंतर चर्चेला उधाण आल्यानंतर स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना यावर स्पष्टीकरण केले. ही भेट राजकीय स्वरूपाची नव्हती. शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचे स्पष्ट केले.





























































