
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. सद्यस्थितीत मुंबईत सुमारे 400 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील 75 टक्के रुग्ण मुंबईबाहेरील आहेत. मुंबईत आतापर्यंत 14 रुग्णांचा म्युकर मायकोसिसमुळे मृत्यू झाला आहे.
‘काळी बुरशी’ प्रकारातील म्युकर मायकोसिस आजारात डोळे, चुरचुरणे, लाल होणे, स्राव येणे, नाक दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, नाकातून बुरशीजन्य काळा स्राव येणे अशा लक्षणांनंतर या आजाराच्या विषाणू थेट मेंदूवर हल्ला करीत असल्याने जीविताला धोका निर्माण होतो. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून या आजाराच्या रुग्णांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या आजारावर प्रभावी असणारे इंजेक्शन ‘एम्फोटेरिसिन-बी लॅपोझोम’ महापालिकेच्या रुग्णालयांत मोफत दिले जात आहे. तर आता खासगी रुग्णालयांनाही शुल्क आकारून हे इंजेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत महापालिकेकडे आवश्यक इंजेक्शन असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. एकूण 400 रुग्णांतील सुमारे 70 ते 80 रुग्ण खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहे.
म्युकर मायकोसिसचा विषाणू डोळे आणि नाकावर प्रभाव टाकत असल्यामुळे आवश्यकता असलेल्या अनेक रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली. यामध्ये डोळे, नाकातील प्रभावीत भागावरील इन्फेक्शन काढून टाकण्यात येते. या आजाराचे रुग्ण बरे होण्यास सुमारे सहा आठवडय़ांपेक्षा जास्त कालावधी लागत आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या तरी कमी आहे. मात्र पालिकेच्या माध्यमातून आवश्यक उपचार, शस्त्रक्रिया सुरू असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.



























































