
कोरोनाच्या दुसऱया लाटेने देशभरात हाहाकार उडाला होता. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला होता. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससाठी रेमडेसिवीरसारख्या औषधांसाठी पळापळ सुरू होती. मात्र आता तब्बल 67 दिवसांनंतर कोरोनाच्या दुसऱया लाटेचा वेग देशभरात घसरण्यास सुरुवात झाली असून मागील 24 दिवसांत दररोज आढळणाऱया रुग्णसंख्येत 63 टक्के घट झाली आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 1 मार्चला देशात 12,270 रुग्ण समोर आले होते. 67 दिवसांनंतर 6 मे रोजी हा आकडा 34 पट वाढून 4.14 लाखांच्या पुढे पोहचला, मात्र गेल्या काही दिवसांपासून हा वेग देशभरात मंदावला आहे.
दररोज आढळणाऱया रुग्णांच्या संख्येत 10 हजारांची घट होत आहे. जर हा ट्रेंड असाच राहिला तर 10 जूननंतर रोज मिळणाऱया रुग्णांच्या संख्येत 50 हजारांची घट होईल. यानंतर हा आकडा अजून कमी होऊ शकतो.
- सोमवारी देशभरात 1 लाख 26 हजार 649 नवीन संक्रमित आढळले, तर 2 लाख 54 हजार 879 रुग्णांनी कोरोनावर मात केली. नवीन संक्रमितांचा आकडा मागील 55 दिवसांतील सर्वात कमी आहे.
- मृतांच्या आकडय़ातही घट झालेली पाहायला मिळत आहे. 35 दिवसांनंतर मृतांचा आकडा 3000 च्या खाली उतरला. सोमवारी 2,781 रुग्णांचा मृत्यू झाला.
- देशभरात ऑक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत एका दिवसात 1 लाख 31 हजार 31 ची घट झाली आहे. आता देशात 18 लाख 90 हजार 975 संक्रमितांवर उपचार सुरू आहेत. मागील 22 दिवसांत यात 18 लाख 50 हजार 327 घट झालेली पाहायला मिळत आहे.
चाचण्या वाढूनही रुग्ण कमी
दुसऱया लाटेत सरकारने चाचण्यांची संख्या वाढवल्यानंतर नवीन संक्रमितांचा आकडाही वाढू लागला. 1 मार्चला 7.59 लाख चाचण्या झाल्या आणि 12,270 संक्रमितांची नोंद झाली. यानंतर 31 मार्चला 11.25 लाख चाचण्या झाल्या आणि रुग्णही 72 हजार झाले. 6 मे रोजी देशात सर्वात जास्त 4.14 लाख संक्रमित आढळले होते, पण यानंतर चाचण्या वाढवूनही रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे.




























































