
कोरोनाची लागण झाल्याने बाबू गिलबिले या 103 वर्षीय आजोबांना त्यांच्या घरच्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या उपचारांमुळे त्यांची तब्येत सुधारत होती. पण कोरोनाबाधितांचे वाढणारे प्रमाण आणि रुग्णांचे होणारे मृत्यू यामुळे घाबरलेल्या आजोबांनी रुग्णालयातून घरी जाण्याचा हट्ट धरला. शेवटी त्यांच्या घरच्यांनी आजोबांना घरी नेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने शेतातच उपचार केले. आठ दिवसांच्या उपचारानंतर त्यांची तब्येत ठणठणीत झाली.
कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील लाकूडवाडी येथील रहिवासी बाबू गिलबिले यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने आजरा कोविड सेंटरमध्ये आणण्यात आले. त्या ठिकाणी ऑक्सिजन बेड शिल्लक नव्हता. आजोबांची ऑक्सिजन पातळी खालावल्याने तातडीने त्यांना गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे ऑक्सिजन लावल्यानंतर त्यांची ऑक्सिजन पातळी 80 पर्यंत गेली.
उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यावर गिलबिले यांच्या तब्येतीत सुधारणा झाली, मात्र आजूबाजूचे रुग्ण पाहून ते अस्वस्थ झाले. त्यांनी रुग्णालयातून घरी जाण्याचा हट्ट धरला. नाइलाज झाल्याने मुलगा चंद्रकांत व सून वत्सला यांनी डॉक्टरांना विनंती करून त्यांना घरी आणले आणि शेतात राहण्याची व्यवस्था करून डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्यावर उपचार केले.
- डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या, औषधे आणि फलाहार घेऊन आजोबा ठणठणीत झाले. आता त्यांची ऑक्सिजनची पातळी 98 इतकी आहे. सध्या ते शेतात सर्वत्र फिरत असून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. त्यांनी कोरोनाला हरवले आहे.


























































